प्रवासी महिलेचे दागिने चोरणाऱ्या चार महिलांना रामनगर पोलीसांनी केले जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरात नागपूरला जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या एका प्रवासी महिलेच्या पर्समधील सुमारे २ लाख १७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत चार आरोपी महिलांना ताब्यात घेतले. संशयितांकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादी सुधा नारायण तुरकेले ५३ वर्षे , रा. नगीनाबाग, चंद्रपूर या चंद्रपूर बसस्थानकातील नागपूर प्लॅटफॉर्मवर बसची प्रतीक्षा करत होत्या. बसमध्ये चढण्याच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके किंमत अंदाजे ७२ हजार रुपये तसेच १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व पदक किंमत अंदाजे १ लाख ४५ हजार रुपये असा एकूण २ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) व ३(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख सपोनि. शिवाजी नागवे यांच्या नेतृत्वात विशेष पथके तयार करण्यात आली.
एक पथक बसस्थानक परिसरात, तर दुसरे पथक पडोली चौक परिसरात रवाना करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित महिलांचा शोध घेत असताना पडोली चौकात संशयास्पद हालचाली करणाऱ्या आरोपी रूपा विशाल नाडे २५ वर्षे व मैना महेंद्र मानकर ३५ वर्षे, दोघीही रा. रामेश्वरी टोली, नागपूर यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
चौकशीत चोरीतील मुद्देमाल त्यांच्या दोन साथीदार महिलांकडे असून त्या ट्रॅव्हल्सने नागपूरकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोउपनि कृष्णा दराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वरोरा येथील आनंदवन चौकात ट्रॅव्हल्स थांबवून तपासणी केली. त्यावेळी आरोपी अनिता पिंटू हातागडे ३५ वर्षे व ज्योती विजय हातागडे ३२ वर्षे, दोघीही रा. रामेश्वरी टोली, नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले.
महिला आरोपी ज्योती विजय हातागडे हिच्या झडतीदरम्यान फिर्यादीचे चोरीस गेलेले सोन्याचे झुमके व मंगळसूत्रासह संपूर्ण २ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर चारही महिलांना रामनगर पोलीस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात गुन्हे अन्वेषण पथकातील सपोनि शिवाजी नागवे, सपोनि हनुमान उगले, पोउपनि कृष्णा दराडे, पोहवा प्रकाश बलकी, बाबा नैताम, मपोहवा मनीषा मोरे, पोहवा रामप्रसाद नैताम, आंनद खरात, रवीकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, पोअं प्रकाश मडावी, संदिप गेडाम, पंकज ठोंबरे, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके तसेच मपोअं ब्ल्युटी साखरे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




