अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन प्रकरणातील आरोपी अद्याप फरार : माहिती देण्याचे रामनगर पोलिसांचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील राजीव गांधी नगर परिसरात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी रामनगर पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८७१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३३३ तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ मधील कलम ८ व १२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास राजीव गांधी नगर येथील डीआरसी हेल्थ क्लबजवळील एका घरात अल्पवयीन पीडित मुलगी एकटी असताना घरात घुसलेल्या एका तरुणाने तिच्या मागून येत तिला जबरदस्तीने मिठी मारली. मुलीने मोठ्याने आरडाओरडा केल्यानंतर संबंधित तरुण तेथून पळून गेला. त्याचवेळी मुलीचे वडील घरी पोहोचल्याने त्यांनी आरोपीचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला.
घटनास्थळी आरोपीने वापरलेली टीव्हीएस ज्युपिटर क्रं.एमएच-३४ बीडब्ल्यू-५०८३ ही दुचाकी आढळून आली. वाहनाच्या तपासातून ते अल्का कुळसंगे यांच्या नावावर असल्याचे समोर आले. पुढील चौकशीत घटनेच्या दिवशी हे वाहन त्यांचा मुलगा वैभव कालीदास कुळसंगे २५ वर्ष रा. शांती नगर, बंगाली कॅम्प, दास किराणा दुकानाजवळ, चंद्रपूर वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपीचे वर्णन सावळा वर्ण, कुरळे केस आणि छातीवर टॅटू असे आहे.या आरोपीबाबत कोणालाही माहिती असल्यास रामनगर पोलीस ठाणे (दूरध्वनी : ०७१७२-२५३२००), मोबाइल : ८५५२०७९८०७ किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर (दूरध्वनी : ०७१७२-२७३२५८) येथे तातडीने संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन रामनगर पोलिसांनी केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




