महत्वाच्या बातम्या

 हिंद-दी-चादर प्रवेशद्वाराचे लोकार्पण : गुरु तेग बहादूरजींचे जीवन मानवतेचा आदर्श – आ. सुधीर मुनगंटीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : तुकूम येथील श्री गुरुनानक दरबार गुरुद्वारासमोरील श्री गुरु तेग बहादूरजी हिंद-दी-चादर प्रवेशद्वार उभारणीसाठी ४५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा गुरुद्वारा समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. गुरु तेग बहादूरजींच्या प्रकाश उत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या या भव्य प्रवेशद्वाराच्या लोकार्पणानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी, हे प्रवेशद्वार केवळ वाहतुकीसाठी उभारलेली वास्तू नसून शौर्य, त्याग, मानवता, सेवाभाव आणि धर्मरक्षणाचा संदेश देणारे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन केले.

आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२४ रोजी या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन झाले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गुरुद्वारा श्री गुरुनानक दरबारसमोर ४५ लाख रुपयांच्या निधीतून हे भव्य प्रवेशद्वार साकार झाले असून त्यास श्री गुरु तेग बहादूरजी हिंद-दी-चादर प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात आले आहे. ४ ऑगस्ट २०२६ रोजी गुरुद्वारा समितीच्या वतीने आयोजित समारंभात या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमात अर्जुन सिंग धुन्ना आणि श्रीमती दशमीत वाधवा यांनी गुरु तेग बहादूरजींच्या जीवनावर आधारित सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, या सादरीकरणातून गुरु तेग बहादूरजींच्या त्याग, बलिदान आणि धर्मरक्षणाच्या कार्याची प्रभावी अनुभूती मिळाली. हिंद-दी-चादर ही उपाधी त्यांना का प्राप्त झाली, हे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. त्यांनी दोन्ही कलाकारांचे विशेष अभिनंदनही केले.

या प्रवेशद्वारासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अर्जुन सिंग धुन्ना व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. त्याची दखल घेत तातडीने निधी मंजूर करण्यात आला, असे सांगताना आ. मुनगंटीवार यांनी हे प्रवेशद्वार समाजात शौर्य, करुणा, त्याग आणि सेवाभावाचा संदेश पोहोचवणारे स्मारक असल्याचे नमूद केले.

शीख समाजाच्या परंपरेचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, निःस्वार्थ सेवा, मानवता आणि लंगराच्या परंपरेतून संपूर्ण जगाला बंधुभावाचा संदेश देण्याचे कार्य शीख समाजाने केले आहे. भुकेल्याला अन्न देणे हीच खरी ईश्वरभक्ती असल्याची शिकवण समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.गुरु तेग बहादूरजींनी धर्मांतराचा पुरस्कार न करता प्रत्येकाने आपल्या धर्मात राहून श्रद्धा आणि मूल्यांचे रक्षण करावे, यासाठी स्वतःचे सर्वोच्च बलिदान दिले. त्यामुळे त्यांचे जीवन संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असल्याचेही आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

यावेळी गुरुद्वारा समिती, शीख समाज आणि उपस्थित नागरिकांनी केलेल्या सन्मानाबद्दल आ. मुनगंटीवार यांनी खालसा हेल्प फाउंडेशनचे तेजेंदर सिंग दारी, अर्जुन सिंग धुन्ना, बलबीर सिंग गुरोन, चिंटू गढोंक, पुरण सिंग जुनेजा, सोनू अनेजा, राजू सचदेवा, नीतू बावरे तसेच श्री गुरुद्वारा गुरुनानक दरबार समितीचे आभार मानले.समारंभाला गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी, शीख समाजातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





  Print






News - Chandrapur




Related Photos