ठेकेदाराच्या कथित निष्काळजीपणामुळे शतकाहून जुने झाड कोसळले : नगर परिषद कारवाई कधी करणार?

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात १६ जुलै रोजी घडलेल्या शतकाहून जुन्या कडू निंबाच्या झाडाच्या दुर्घटनेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामीण रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीचे कंपाऊंड वॉल बांधकाम सुरू असताना जेसीबीच्या साहाय्याने झाडाच्या मुळाजवळ मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने झाडाची मुख्य मुळे तुटली होती. त्यामुळे झाडाची पकड कमकुवत झाली आणि अखेर ते अचानक कोसळल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
१६ जुलै रोजी हे विशाल कडू निंबाचे झाड कोसळून तेथून जात असलेल्या तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर आदळले. झाडाची मोठी फांदी बसच्या पुढील काचेवर आदळल्याने काच पूर्णपणे फुटली. एवढेच नव्हे तर लाकडाचा मोठा तुकडा बसच्या आतपर्यंत घुसला. ही घटना अत्यंत भीषण असली तरी सुदैवाने बसमधील प्रवासी व चालक-वाहक यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण रुग्णालयाच्या भिंतीच्या बांधकामासाठी जेसीबीने झाडाच्या अगदी मुळालगत खोल खड्डा खोदला होता. या खोदकामामुळे झाडाची प्रमुख मुळे तुटून त्याचा नैसर्गिक आधार नष्ट झाला. त्यानंतर काही दिवसांतच झाड कोसळले. त्यामुळे या दुर्घटनेला नैसर्गिक कारणांपेक्षा बांधकामातील निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, शहरात खासगी जागेतील झाडांची अनधिकृत तोड केल्यास नगर परिषद संबंधितांवर दंडात्मक कारवाई करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, शंभर वर्षांहून जुने झाड कथित निष्काळजीपणामुळे कोसळूनही संबंधित ठेकेदारावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने नगर परिषदेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून झाड कोसळण्यास जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांदरम्यान जुन्या वृक्षांच्या संरक्षणासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात नगर परिषद प्रशासन संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करणार का, तसेच झाड कोसळण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




