महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत २७ वा कारगिल विजय दिवस देशभक्तीच्या उत्साहात साजरा


- कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते यांच्या योगदानाचा गौरव; शहीद वीर जवानांना भावपूर्ण अभिवादन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद वीर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाला अभिवादन करण्यासाठी रविवारी २६ गडचिरोली येथे २७ वा कारगिल विजय दिवस विविध देशभक्तीपर कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, कारगिल स्मारक समिती आणि माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गडचिरोली शहरातील कारगिल स्मारक हे जिल्ह्यातील देशभक्तीचे प्रेरणास्थान मानले जाते. या स्मारकाच्या उभारणीसाठी कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते यांनी सन २००० पासून तब्बल २२ वर्षे शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा, पायपीट आणि अथक संघर्ष केला. त्यांच्या या अविरत प्रयत्नांचे फलित म्हणून सन २०२२ मध्ये गडचिरोली शहरात शहीद वीर जवानांच्या स्मृतींना समर्पित कारगिल स्मारक साकार झाले. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात उदय धकाते यांच्या या कार्याचा विशेष गौरव केला.

विशेष म्हणजे, गेल्या २७ वर्षांपासून कारगिल चौकात कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादन करण्याची परंपरा अखंडपणे जपली जात असून, यावर्षीही त्याच उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौकातून माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य कारगिल विजय रॅलीने झाली. या रॅलीत गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, शालेय विद्यार्थी, माजी सैनिक, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅली कारगिल चौकातील शहीद स्मारकावर पोहोचल्यानंतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

त्यानंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमात वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, गुणवंत पाल्य तसेच विविध पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या त्यागाला अभिवादन केले.

कार्यक्रमाला गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉ. अशोकराव नेते, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे जनरल मॅनेजर लेफ्टनंट कर्नल रामनाथ स्वामी, कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ महाव्यवस्थापक कृष्णा रेड्डी, गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर, होमराज डोनाळकर, व्यापारी संघटनेचे घिसूलाल काब्रा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शहरातील विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, माजी सैनिक, युवक, महिला, विद्यार्थी तसेच देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद वीर जवानांना श्रद्धासुमने अर्पण केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कारगिल स्मारक समितीचे प्रकाश भांडेकर, कालू गोवर्धन, नंदू कुमरे, प्रकाश धकाते, मोबीन सय्यद, सुचिता धकाते, ऋषी वंजारी (सेवानिवृत्त), हवालदार डिसेज वालदे (सेवानिवृत्त), हवालदार महादेव वासेकर (सेवानिवृत्त), हवालदार विनायक गेडाम (सेवानिवृत्त), हवालदार कैलास सिडाम (सेवानिवृत्त) यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यमान व माजी सैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन माजी सैनिक हवालदार डिसेज वालदे यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos