महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर पोलिसांचा छापा : ५ आरोपींना अटक, २.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करणाऱ्या टोळीचा गडचिरोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गोकुळनगर परिसरातील दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी एकूण २ लाख १५ हजार ७१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत २० जून रोजी ही मोठी कारवाई करण्यात आली.

गडचिरोलीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, गोकुळनगर येथील विवेक अवधराम गुप्ता याने त्याच्या राहत्या घरी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा विक्रीसाठी दडवून ठेवला आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने विवेक गुप्ता याच्या राहत्या घरी आणि भाड्याच्या खोलीवर पंचांसमक्ष एकाच वेळी छापे टाकले. 

या दोन्ही ठिकाणी पोलिसांना मोठ्या प्रमाणावर अवैध तंबाखू आणि कच्ची सुपारी मिळून आली. या कारवाईत पोलिसांनी ४० हजार १२० रुपये किमतीचे ईगल हुक्का शिशा तंबाखू चे ८२ पॅकेट, १ लाख ६१ हजार ५०० रुपये किमतीची ३२३ किलो कच्ची सुपारी, १२ हजार रुपयांची ६७ किलो ईगल शिशा खर्रा पत्ती आणि २ हजार १० रुपयांचे इतर साहित्य, असा एकूण २ लाख १५ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी जितेंद्र कुंजाम यांच्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात आरोपी विवेक अवधराम गुप्ता (२१), अरविंद अवधराम गुप्ता (३१), यश सुभाष चव्हाण (२१), अजय सतीश नेडाम (२१) आणि अनिकेत घनश्याम बांचोळे (२७, सर्व रा. गोकुळनगर, गडचिरोली) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमांन्वये गुन्हा क्रमांक ८१०/२०२६ नुसार गुन्हा दाखल करून पाचही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. 

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कफील आगलावे करत आहेत. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) बी. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस ठाण्याचे सपोनि शरद मेश्राम यांच्या नेतृत्वात पोउपनि अतुल तराळे, पोउपनि प्रवीण बुंदे व पोलीस अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos