महत्वाच्या बातम्या

 प्रशासनाने लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून प्रत्येक अर्जदाराला न्याय देण्याचा प्रयत्न करावा- आमदार राजेश बकाने


- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

- प्रलंबित प्रश्नांचा १०० टक्के निपटारा व्हावा

- ४ हजार ५१९ लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान हे शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत थेट पोहोचविणारे प्रभावी माध्यम ठरत असून, प्रशासनाने लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून प्रत्येक अर्जदाराला न्याय मिळेल, यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आमदार राजेश बकाने यांनी केले.

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी अपर जिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, वर्धा नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, संजय गांधी निराधार समिती वर्धा ग्रामीणचे अध्यक्ष आशिष कुचेवार, वर्धा शहरचे सौरभ देशमुख, सेलूचे अशोक मुडे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार राजेश बकाने म्हणाले, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या समाधान शिबिरांमुळे हजारो नागरिकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लागल्या आहेत. जिल्हाधिकारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला, ही बाब कौतुकास्पद आहे. सध्या सुमारे ८० टक्के अर्जांचा निपटारा होत असला तरी तो १०० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले की, पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीची माहिती मिळताच पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री त्या व्यक्तीची सुरक्षित सुटका केली. अशा तत्पर कार्यवाहीमुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी वान्मथी सी. म्हणाल्या की, महाराजस्व अभियानाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातून झाली असून, या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे १लाख ५० हजार लाभार्थ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यात आला आहे. अनेक विभागांना एकाच छताखाली आणून नागरिकांना विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे काम या शिबिरातून होत आहे. महसूल विभाग हा शासन व्यवस्थेचा कणा असून प्रत्येक विकासकामात तो महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महसूल दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छाही दिल्या.

आशिष कुचेवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या शिबिरात ४ हजार ५१९ लाभार्थ्यांना ऑनलाइन सातबारा, लेक लाडकी योजना, घरकुल, पट्टे वाटप, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, स्वाधार, कृषी यांत्रिकीकरण, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, गटई स्टॉल, फ्रीहोल्ड व प्रॉपर्टी कार्ड, विविध शिष्यवृत्ती योजना, रमाई आवास योजना, पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, शेतपिक नुकसान भरपाई, मुद्रांक शुल्क माफी, ट्रॅक्टर वाटप, शिधापत्रिका, उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, श्रावणबाळ योजना आदी विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला.

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार राजेश बकाने व मान्यवरांनी विविध विभागांच्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. प्रास्ताविक तहसीलदार शकुंतला पराजे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्योती भगत यांनी केले. शिबिराला उपविभागीय विश्वास सिरसाट, तहसीलदार संदीप पुंडेकर, शकुंतला पराजे, हरीष काळे यांच्यासह वर्धा व सेलू तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos