महत्वाच्या बातम्या

 सोमनाळा वनक्षेत्रात बिबट्याचे दोन बछडे आढळले : वन विभागाची तत्पर कारवाई, नागरिकांना जंगलात जाण्यास बंदी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : स्थानिक वनक्षेत्रांतर्गत सोमनाळा गावाजवळील जंगल परिसरात बिबट्याचे दोन बछडे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बछड्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना राबविल्या. सध्या दोन्ही बछड्यांचे रेस्क्यू करण्यात आले असून त्यांच्यावर वन अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चोवीस तास बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बिबट्याने आपल्या बछड्यांना वनक्षेत्रातील एका सुरक्षित ठिकाणी तात्पुरते सोडून गेल्याचे दिसून आले. वन्यजीवांच्या नैसर्गिक वर्तनाचा विचार करून वन विभागाने कोणताही अनावश्यक हस्तक्षेप टाळत परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर बछड्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचे रेस्क्यू करण्यात आले.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बछडे अंदाजे एक ते दीड महिन्यांचे असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जात असून त्यांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.

दरम्यान, बछड्यांची आई पुन्हा आपल्या पिल्लांकडे परत येण्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने संपूर्ण परिसरात विशेष दक्षता बाळगली आहे. तिचा शोध घेण्याचे काम सुरू असून परिस्थितीवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. बछड्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्याच्या दृष्टीने वन विभाग नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनेनंतर बछड्यांना कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मानवी हस्तक्षेप टाळता यावा, यासाठी वन विभागाने सोमनाळा, मिरेगाव तसेच लगतच्या गावांमध्ये दवंडी पिटवून नागरिकांना संबंधित वनक्षेत्रात जाण्यास सक्त मनाई केली आहे. तसेच उत्सुकतेपोटी जंगल परिसरात गर्दी न करण्याचे आणि वन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वन्यजीवांचे संवर्धन आणि त्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद करत, कोणत्याही प्रकारची माहिती अथवा बिबट्याचा वावर आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos