महत्वाच्या बातम्या

 पुलाच्या मागणीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष : आठ एकरांतील धान पाण्याखाली


- गोगाव परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गोगाव परिसरातील सखल भागात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पूल उभारण्याची मागणी शेतकऱ्यांनी अनेकदा रेल्वे प्रशासनाकडे केली होती. मात्र, या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये साचले असून तब्बल आठ एकरांवरील धान पीक जलमय झाले आहे. अनेक दिवसांपासून पाणी न ओसरल्याने उभ्या पिकाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाले आहेत.

गोगावजवळील सखल भागातून रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना पावसाळ्यात या ठिकाणी पाणी तुंबून शेतीचे मोठे नुकसान होईल, असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी यापूर्वीच दिला होता. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम राहावा आणि शेतीचे संरक्षण व्हावे, यासाठी या ठिकाणी पुलाचे बांधकाम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी वारंवार रेल्वे विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या रास्त मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने आज त्याचे गंभीर परिणाम समोर आले आहेत.

सततच्या पावसामुळे परिसरातील पाणी शेतांमध्ये साचून राहिले असून जवळपास आठ एकरांतील धान पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. पाणी अनेक दिवसांपासून न ओसरल्यामुळे पिके कुजण्याची भीती निर्माण झाली असून संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला आहे. या घटनेत काळूराम मानकर, कालिदास चापले, आनंदराव चापले, मारोती चापले, अनिल चापले, अनिल मंगर आणि नयन फुलझले या शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या मते, वेळेत पूल उभारण्यात आला असता तर पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा झाला असता आणि आजची परिस्थिती उद्भवली नसती. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उभे पीक पाण्यात बुडाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

दरवर्षी शेती बुडण्याचा धोका -

या ठिकाणी तातडीने पूल उभारण्यात आला नाही, तर दर पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वारंवार पाणी साचल्यास येथील सुपीक शेती कायमस्वरूपी निकामी होण्याचा धोका असून शेतकरी भूमिहीन होण्याची वेळ येऊ शकते. दरवर्षी शासनाकडून नुकसानभरपाई मिळेलच, याची शाश्वती नसल्याने कायमस्वरूपी जलनिस्सारणाची व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करावा - 

नुकसानग्रस्त शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नात तातडीने लक्ष घालून रेल्वे प्रशासनाकडून संबंधित ठिकाणी पूल उभारण्याचे काम त्वरित सुरू करावे, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात दरवर्षी शेतीचे नुकसान होऊन परिसरातील शेतकऱ्यांवर उदरनिर्वाहाचे गंभीर संकट ओढवेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.






  Print






News - Gadchiroli




Related Photos