महत्वाच्या बातम्या

 सवारीदरम्यान तुफान राडा : काठीच्या प्रहाराने युवक रक्तबंबाळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील साईबाबा वॉर्ड परिसरात मोहरमच्या नवमीच्या निमित्ताने सुरू असलेल्या सवारीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे हिंसक रूप धारण झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत १९ वर्षीय युवकाच्या नाकावर काठीने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, साईबाबा वॉर्ड येथील मोहरमच्या नवमी निमित्त रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास परिसरातील नालसाहब बंगला सवारीची तयारी सुरू होती. सवारी पाहण्यासाठी आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी ओम किशोर टपाले (वय १९) व इतर युवक सवारीमध्ये नृत्य करत असताना फकीर मोहल्ला येथील जुनेद यास थोडे मागे होऊन नाचण्यास सांगितल्याने वाद निर्माण झाला. हा वाद काही क्षणांतच झटापटीत बदलला.

भांडण सोडविण्यासाठी ओम टपाले व इतर कुटुंबीय पुढे आले असता रजा (वय अंदाजे १९) याने ओम टपाले याला धरून खेचले. त्याचवेळी एका विधी संघर्ष बालकाने काठीने ओमच्या नाकावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात ओम टपाले यांच्या नाकाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी व कुटुंबीयांनी हस्तक्षेप करून भांडण शांत केले. त्यानंतर जखमी ओम टपाले याला तातडीने बल्लारपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे रेफर केले.

या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी जुनेद, रजा आणि एका विधी संघर्ष बालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos