महत्वाच्या बातम्या

 बंदी घातलेल्या गुटख्यासह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त : राजुरा पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवैध गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेला सुगंधित तंबाखू, पान मसाला आणि वाहतुकीसाठी वापरलेली चारचाकी असा एकूण ६ लाख ५१ हजार ८९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात वाहन चालक व मालकाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.

प्राप्त माहितीनुसार १० जुलै २०२६ रोजी राजुरा शहरात पेट्रोलिंग सुरू असताना गुन्हे शोध पथकाला गुप्त माहिती मिळाली की, इंदिरानगर वार्ड परिसरात उभी असलेल्या मारुती सुझुकी इको क्र. MH-३४-AA-४९९६ या वाहनामध्ये शासनाने बंदी घातलेला सुगंधित तंबाखू व पान मसाला साठवून ठेवण्यात आला आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहनाची पाहणी केली. वाहनामध्ये कोणतीही व्यक्ती आढळून आली नाही. परिसरातील नागरिकांकडे चौकशी करूनही चालक अथवा मालकाची माहिती मिळाली नाही. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता विविध कंपन्यांच्या गुटखा, पान मसाला, सुपारी आणि तंबाखूची मोठ्या प्रमाणात साठवण करण्यात आल्याचे उघड झाले.

कारवाईदरम्यान गोल्ड स्वीट सुपारी, सिग्नेचर पान मसाला, राजू निवास, राजश्री पान मसाला, ब्लॅक लेबल तंबाखू, झाफरानी जर्दा, बाजीराव फ्लेवर्ड पान मसाला अ‍ॅक्टझोन च्युइंग टोबॅको विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू आणि मस्तानी तंबाखू आदी ब्रँडचा एकूण १ लाख ५१ हजार ८९१ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला. तसेच माल वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे ५ लाख रुपयांची मारुती सुझुकी इको जप्त करण्यात आली.

शासनाने सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व साठ्यावर बंदी घातलेली असतानाही जनतेच्या आरोग्यास अपायकारक असलेला हा माल विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने वाहन चालक व मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित तरतुदींनुसार राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात प्रणय दामोधर कांबळे व पथक अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर व गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पोअं शफीक शेख, मिलींद जांभुळे, महेश बोलगोडवार शरद राठोड रमेश बस्सी, यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos