महत्वाच्या बातम्या

 रूम सर्व्हिसच्या युक्तीने रामनगर पोलिसांची धडक कारवाई : तिघे एमडी विक्रेते रंगेहात जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिध / चंद्रपूर : शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात रामनगर पोलिसांनी २९ जून रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास मोठी कारवाई करत मेफेड्रोन (एमडी) या घातक अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघा आरोपींना रंगेहात अटक केली. या कारवाईत सुमारे २२.३२ ग्रॅम एमडी पावडर, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण १ लाख ६६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८८४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क), २२(ब) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रामनगर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, जिल्हा परिषद कार्यालयासमोरील सुपर लॉजमध्ये दोन ते तीन इसम मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने थांबले आहेत. माहितीची खातरजमा केल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या परवानगीने विशेष पथकाने धाड टाकली.

धाडीदरम्यान आरोपी ज्या खोलीत थांबले होते, त्या खोलीपर्यंत कोणतीही शंका न येऊ देता पोहोचणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. यावेळी पोलीस हवालदार आनंद खरात यांनी रूम सर्व्हिसचा बहाणा करून दरवाजा उघडण्याची युक्ती लढवली. आरोपींनी दरवाजा उघडताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांना अंमली पदार्थासह ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अब्दुल राजीक अब्दुल रशीद (वय ४४), रा. खैर मोहम्मद प्लॉट, जुना शहर, अकोला, शेख मुस्तफा शेख रहिम कुरेशी रा. खैर मोहम्मद प्लॉट, जुना शहर, अकोला आणि मोहम्मद नासीर रियाज शेख रा. तुकूम तलाव, उस्मानिया मशिदीजवळ, चंद्रपूर यांचा समावेश आहे.

कारवाईदरम्यान आरोपींकडून १ लाख ३० हजार रुपये किमतीची एमडी पावडर, सुमारे ३६ हजार रुपयांचे मोबाईल फोन तसेच इलेक्ट्रॉनिक वजनकाटा जप्त करण्यात आला.

सदर धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातखडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचा नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि शिवाजी नागवे, सपोनि हनुमान उगले, पोउपनि कृष्णा दराडे, पोहवा आनंद खरात, पोहवा शरद कुडे, पोहवा जितेंद्र आकरे, पोहवा राम नैताम, पोहवा बाबा नैताम, सफौ प्रकाश बलकी, पोअ पंकज पोंडे, पो अं प्रकाश मडावी, पोअं संदीप गेडाम, पोअं प्रफुल पप्पुलवार, पोअं सुरेश कोरवार, पंकज ठोंबरे, पोहवा रवीकुमार, मपोहवा मनीषा मोरे, मपोअ ब्युटी साखरे यांनी केले.

शहरात वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी उचललेले हे कठोर पाऊल मानले जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos