बल्लारशाह रेल्वे स्थानकावर १०.१२ लाखांचे संशयित HTBT कापूस बियाणे जप्त : कृषी विभागाची धडक कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा कृषी विभागाने मोठी कारवाई करत बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयातून ५३३.३० किलो संशयित आणि अनधिकृत HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाणे जप्त केले. या कारवाईत १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून संबंधित पुरवठादार आणि प्राप्तकर्त्याविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी जीआरपी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
कृषी विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद चंद्रपूर येथील मोहीम अधिकारी लकेश कटरे यांना ३१ मे रोजी गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी भरारी पथकासह बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील पार्सल कार्यालयात तपासणी केली. यावेळी १० मोठ्या पांढऱ्या पिशव्या आणि दोन छोट्या गोण्यांमध्ये संशयित एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा आढळून आला.
प्राथमिक चौकशीत हा साठा मे. सैयद एंटरप्रायझेस, गांधी बोम्मा सेंटर, विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथून श्री इम्तियाज, मार्केट रोड, बल्लारशाह यांच्या नावाने रेल्वे पार्सलमार्फत पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र संबंधित प्राप्तकर्ता बियाणे स्वीकारण्यासाठी हजर झाला नाही. त्यामुळे कृषी विभागाने तत्काळ रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा बल आणि जीआरपीला लेखी सूचना देत संशयित बियाण्यांचा साठा ताब्यात ठेवण्यास सांगितले होते.
त्यानंतर जवळपास पंधरा दिवस उलटल्यानंतरही ना प्राप्तकर्ता हजर झाला, ना पुरवठादाराकडून कोणताही पत्रव्यवहार करण्यात आला. त्यामुळे १५ जून रोजी कृषी विभागाने संपूर्ण साठ्याची तपासणी करून जप्तीची कारवाई केली.
तपासणीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांच्या पिशव्यांवर उत्पादकाचे नाव, पत्ता, लॉट क्रमांक, लेबल क्रमांक, पॅकिंग दिनांक, वैधता कालावधी, तपासणी दिनांक, जीईएसी (GEAC) मान्यता क्रमांक तसेच विक्री किंमत नमूद नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधितांनी बियाणे नियम १९६८, बीज अधिनियम १९६६, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८ (४) अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका कृषी विभागाने ठेवला आहे.
जप्त केलेल्या ५३३.३० किलो बियाण्यांपैकी १ किलो ६५० ग्रॅम बियाणे नमुन्यांसाठी वेगळे करण्यात आले. हे नमुने उगवण क्षमता, बीटी प्रोटीन आणि HTBT प्रोटीन चाचणीसाठी बीज परीक्षण प्रयोगशाळा, नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
सदर कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व जिल्हा कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात मोहीम अधिकारी लोकेश कात्रे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्रावण बोधे, तालुका कृषी अधिकारी अजय पवार (बल्लारपूर) तसेच कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) पल्लवी संपत गोडबोले यांचा समावेश होता.
News - Chandrapur




Petrol Price




