महत्वाच्या बातम्या

 मैत्रिणीसोबत बोलण्याच्या संशयातून तरुणावर जीवघेणा चाकूहल्ला : कोठारीत खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : किरकोळ कारणावरून वाढलेल्या वैमनस्याचे रूपांतर थेट रक्तरंजित हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना कोठारी येथे घडली. गावातील एका युवतीशी बोलत असल्याच्या संशयातून १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी तरुणावर उपचार करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन परशुराम डिवटे (१९, रा. कोठारी) याची गावातील एका युवतीशी मैत्री होती. याच कारणावरून गणेश बाबुराव काशेट्टीवार याच्या मनात पवनविषयी राग निर्माण झाला होता. यापूर्वीही संबंधित युवतीशी बोलू नये, अशी धमकी देत आरोपीने पवनला शिवीगाळ केले होते.

१ जून रोजी रात्री पवन हा कोठारी येथील वांढरे बीअरबार परिसरात गेला होता. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आरोपी गणेश काशेट्टीवार हा त्याच्या दोन साथीदारांसह तेथे आला. यावेळी त्याने पवनला युवतीशी बोलण्याच्या कारणावरून जाब विचारत शिवीगाळ केली व धक्काबुक्की करून धमकावले. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला.

मात्र, हा वाद तेथेच थांबला नाही. काही वेळाने पवन मोटारसायकलने घरी जात असताना मारोती महाविद्यालयाजवळील कैकाडी माता मंदिर चौकात आरोपी पुन्हा आपल्या दोन साथीदारांसह दबा धरून उभा असल्याचे दिसून आले. पवनने वाहन थांबवताच आरोपीने त्याची कॉलर पकडली आणि खिशातून चाकू काढून त्याच्या हातावर वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली. हल्ल्यानंतर आरोपी व त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले.

प्रेमसंबंधाच्या संशयातून झालेल्या या हल्ल्याने परिसरात संताप व्यक्त होत असून, तरुणांमधील वाढती आक्रमकता पुन्हा एकदा समोर आली आहे.

या प्रकरणी कोठारी पोलिसांनी आरोपी गणेश बाबुराव काशेट्टीवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरार साथीदारांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार योगेश खरसान यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि देविदास वेलादी करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos