कुख्यात गोवंश तस्कर इम्रान बाबू शेख टोळी मकोकाच्या जाळ्यात : चंद्रपूर पोलिसांची ऐतिहासिक मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात संघटित स्वरूपात सुरू असलेल्या अवैध गोवंश तस्करीविरोधात चंद्रपूर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात कठोर आणि ऐतिहासिक कारवाई करत कुख्यात तस्कर इम्रान बाबू शेख व त्याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गोवंश तस्करीच्या प्रकरणात मकोका लागू करण्याची ही चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलीच घटना असून, संघटित गुन्हेगारीविरोधातील पोलिसांच्या धोरणात्मक कारवाईचा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
टोळीप्रमुख इम्रान बाबू शेख (३८), शेख हाशम शेख मौल्ला (२७), मोसिन बेग मुबारक बेग (२९), शेख अन्सारी अशरफ मिया (३०), शेख जुनैद शब्बीर हुसेन (१९) आणि समीर खान करीम खान (१८), वसीम रझ्झाक कुरेशी (३१), सादिक खान नवाब खान (३९), निजाम हमीद शेख (२१) आणि सोहेल शेख अहमद शेख (२३) असे आरोपींचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ एप्रिल रोजी नियमित गस्त व गुन्हेगारांची पडताळणी करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महाराष्ट्रातून तेलंगणा राज्याकडे दोन मालवाहू ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे उघड झाले. माहितीची शहानिशा करून पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संशयित ट्रक ताब्यात घेतले.
वाहनांची तपासणी केल्यानंतर समोर आलेले वास्तव अत्यंत धक्कादायक होते. दोन्ही ट्रकमध्ये एकूण ६३ गोवंश अत्यंत अमानुष आणि क्रूर पद्धतीने कोंबून ठेवण्यात आले होते. जनावरांचे हात, पाय व तोंड दोऱ्यांनी घट्ट बांधण्यात आले होते. वाहन क्षमतेपेक्षा अधिक जनावरे भरल्याने त्यांना हालचालीसाठी पुरेशी जागा नव्हती. तसेच पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. वाहतुकीसाठी आवश्यक असलेली पशुधन विकास विभागाची प्रमाणपत्रे तसेच आरटीओची परवानगीही आरोपींकडे नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.
प्राथमिक तपासात संबंधित गोवंशांची कत्तल करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात चोरटी वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे यांनी केला.
तपासादरम्यान टोळीप्रमुख इम्रान बाबू शेख आणि त्याचे साथीदार हे पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. या टोळीविरुद्ध यापूर्वीही अवैध गोवंश तस्करीसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. संघटित पद्धतीने आर्थिक लाभासाठी सातत्याने गुन्हेगारी कारवाया केल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट झाल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी मकोका कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला.
विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांनी प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत मंजुरी दिल्यानंतर आरोपींविरुद्ध मकोका कायद्याच्या कलम ३(१)(ii), ३(२) व ३(४) अंतर्गत वाढीव आणि कठोर कलमे लागू करण्यात आली. यामुळे आरोपींवरील कारवाई अधिक कठोर झाली असून, संघटित गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
या प्रकरणात शेख हाशम शेख मौल्ला (२७), मोसिन बेग मुबारक बेग (२९), शेख अन्सारी अशरफ मिया (३०), शेख जुनैद शब्बीर हुसेन (१९) आणि समीर खान करीम खान (१८) यांना अटक करण्यात आली आहे. तर टोळीप्रमुख इम्रान बाबू शेख (३८), वसीम रझ्झाक कुरेशी (३१), सादिक खान नवाब खान (३९), निजाम हमीद शेख (२१) आणि सोहेल शेख अहमद शेख (२३) हे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकरूके, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ अरुण खारकर, पोहवा परवरीश शेख, सुधीर मत्ते, पोअं अनिल जामकदम (रामनगर) यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
दरम्यान, जिल्ह्यात अवैध गोवंश तस्करी किंवा कोणत्याही प्रकारची संघटित गुन्हेगारी सहन केली जाणार नाही. अशा गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विरोधात यापुढेही मकोकासारख्या कठोर कायद्यांतर्गत प्रभावी कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा चंद्रपूर पोलिस प्रशासनाने दिला आहे.
News - Chandrapur




Petrol Price




