महत्वाच्या बातम्या

 सासरच्या घरात घुसून जावयाचा थरार : चाकूहल्ल्यात दोन भावांसह मित्र गंभीर जखमी


- घटस्फोटाचा खटला मागे घेण्यास नकार दिल्याने संताप; बल्लारपूर पोलिसांकडून आरोपी जावयाला अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी /  बल्लारपूर :  : बल्लारपूर : न्यायालयात सुरू असलेला घटस्फोटाचा खटला मागे घेऊन पत्नीला आपल्यासोबत पाठविण्याच्या मागणीला नकार दिल्याने संतप्त झालेल्या जावयाने सासरच्या घरात घुसून चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना बल्लारपूर शहरातील बुध्द नगर वॉर्डातील विश्वशांती चौक, टीचर कॉलनी परिसरात मंगळवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या हल्ल्यात पत्नीचे दोन भाऊ आणि त्यांचा मित्र असे तिघे जखमी झाले असून, दोघा भावांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सानिया मिर्झा हिचा २०२१ मध्ये चंद्रपूर येथील शहानवाज हुसेन शेख जमीर याच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही काळाने पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाल्याने सानिया ही आपल्या मुलासह वडिलांच्या घरी बल्लारपूर येथे राहत होती. पतीविरुद्ध चंद्रपूर येथे गुन्हा दाखल असून, दोघांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहानवाज हा एका तरुणासह ॲक्टिव्हा दुचाकीवरून सासरच्या घरी पोहोचला. त्याच्यासोबत आलेला तरुण घराबाहेर थांबला, तर शहानवाज घरात शिरला. न्यायालयात सुरू असलेला खटला मागे घ्या आणि पत्नीला माझ्यासोबत पाठवा, अशी मागणी त्याने केली. मात्र, खटला न्यायालयात सुरू असून तो होऊ द्यावा, असे सासऱ्याने सांगितले.


यावरून वाद विकोपाला गेला. आरोपीने पत्नीचा हात पकडल्याने तिच्या भावांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि खिशातून चाकू काढला. त्याने साळा अयान बेग (२३) याच्यावर चाकूने वार केल्याने त्याच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर मुस्सवीर बेग (२१) याच्यावरही चाकूने वार करण्यात आला. हल्ला रोखण्यासाठी पुढे आलेल्या ताजखान पठाण याच्या हातावरही आरोपीने चाकूने वार केला.
तिघांवर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून ॲक्टिव्हा दुचाकीने पसार झाला. रक्तबंबाळ अवस्थेतील जखमींना तातडीने बल्लारपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दोघा भावांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार बिपिन इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक मदन दिवटे, सफौ गजानन डोईफोडे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी शहानवाज हुसेन शेख जमीर याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत.





  Print






Related Photos