चिखलाने धोकादायक बनला किटाळी मार्ग : तातडीच्या उपाययोजनांसाठी युवासेनेचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : किटाळी चौक ते ईरई नदी पूल तसेच किटाळी चौक ते किटाळी गावादरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी युवासेनेने प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत. मात्र, पावसामुळे रस्त्यावर साचलेला चिखल अद्याप कायम असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आता रस्त्यावरील चिखल तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी युवासेनेने केली आहे.
युवासेना चंद्रपूर विस्तारक संदीप रियाल पटेल, जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे आणि महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक सुरेश पचारे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
किटाळी चौक ते ईरई नदी पूल आणि किटाळी चौक ते किटाळी गावादरम्यानचा रस्ता काही काळापासून खराब अवस्थेत होता. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला होता. या मार्गावरून दररोज प्रवास करणारे नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. अपघाताचा धोका लक्षात घेता युवासेनेने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती.
निवेदनानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत रस्त्यावरील खड्डे बुजविले. प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबद्दल युवासेनेने समाधान व्यक्त केले. मात्र, खड्डे बुजविल्यानंतरही रस्त्यावर साचलेला चिखल आणि पाण्याचा प्रश्न कायम असल्याचे पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील चिखल तातडीने हटवावा, पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच रस्त्याचे डांबरीकरण दर्जेदार पद्धतीने करावे, अशी मागणी युवासेनेने केली आहे. रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना तालुकाप्रमुख सागर गभणे, शहरप्रमुख सय्यद फरदीन, तालुका समन्वयक पवन उडाके, विवान रामटेके, आरिश शेख, सय्यद आकिब, रझा सिद्दीकी, सलमान शेख, फरहान शेख, जाहिद शेख, काशिफ शेख, शाहजान शेख, रोशन खोब्रागडे, धम्मदीप खोब्रागडे, रितिक रायपुरे, मंगेश रायपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने युवासैनिक उपस्थित होते.




Petrol Price




