विसापूरमध्ये २६ नोव्हेंबरला भव्य संविधान सन्मान सोहळा : प्रभात फेरी, निबंध स्पर्धा चे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानिक मूल्यांचा जागर, सामाजिक समतेचा संदेश आणि लोकशाहीविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने तालुक्यातही विसापूर येथे गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा सोहळा पार पडणार असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा यांच्या हस्ते होणार असून, चिंतामणी विद्यालयाचे शिक्षक चंद्रकांत पावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अधिवक्ता ॲड. दीपक चटप प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते यावेळी संविधानाचे महत्त्व, संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
संविधान दिनानिमित्त सकाळी १० वाजता विसापूरमधील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून संविधान सन्मान प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. या प्रभात फेरीत विद्यार्थी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश देत सहभागी होणार आहेत. प्रभात फेरीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ होणार असून, यावेळी पुतळ्याला माल्यार्पण करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.
याशिवाय, २३ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक समतेसाठी संविधान, तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संविधान – सर्वांगीण विकासाची हमी हे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या विषयांवर आपले विचार मांडले. या स्पर्धेचा निकाल संविधान सन्मान सोहळ्यात जाहीर करण्यात येणार असून, विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला तहसीलदार रेणुका कोकाटे, पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे, माजी सरपंच वर्षा कुळमेथे, ग्रामसेवक गणेश कोकाटे आणि आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी कांबळे यांच्यासह विविध समाजांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या आयोजनात चंद्रकांत पावडे यांच्यासह मधुकर भोयर, सुरज कौरासे, अशोक थेरे, अनंतसुग्रीव वानखेडे, दादाजी जीवने, रितू चनकापुरे, लोकचंद भोयर, अशोक तुराणकर, अशोक भोयर, सुनिता पुडके, गुडीषा कांबळे, अश्विनी मिलमिले, फरीद शेख, सुनील नाकाडे, सुनील बुटले, संजय वाघाडे, सचिन पुणेकर, अमोल डोंगरे, आशिष तितरे, रोशन नैताम, संदेश टेकाम आणि समीर शेख यांच्यासह संविधान सन्मान समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
भारतीय संविधानाने दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावीत, संविधानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि नव्या पिढीला संविधानाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विसापूरमधील नागरिक, विद्यार्थी, युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संविधान सन्मान समिती आणि विसापूरमधील संविधानवादी नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




