महत्वाच्या बातम्या

 बिथरलेल्या बैलाच्या हल्ल्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : कारने धडक दिल्याने बिथरलेल्या बैलाने दुचाकीस्वारावर अचानक शिंगाने हल्ला केला. या हल्ल्यात बैलाचे शिंग छातीत घुसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी-ब्रह्मपुरी मार्गावर रविवारी २२ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

मंगेश खुशाल चंदनकर ४२ वर्षे रा. व्याहाडपेठ, चौदामैल, ता. नागपूर ग्रामीण) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मंगेश हे एमएच-३१/जीई-१०३२ क्रमांकाच्या मोटरसायकलने एकटेच पाटणसावंगी येथून कळमेश्वरमार्गे व्याहाडपेठ येथे जात होते. दरम्यान, पाटणसावंगी-ब्रह्मपुरी मार्गावर एका कारने बैलाला धडक दिली. त्यामुळे बैल बिथरला. त्याचवेळी मंगेश यांची दुचाकी बैलाच्या समांतर आली. बिथरलेल्या बैलाने अचानक मंगेश यांच्यावर शिंगाने हल्ला चढविला. यात बैलाचे शिंग त्यांच्या छातीत घुसल्याने ते गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती अक्षय शेवतकर यांच्याकडून मिळताच सावनेर पोलिसांसह हितेश बन्सोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. हितेश बन्सोड यांनी जखमी मंगेश यांना तातडीने धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, सावनेर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.





  Print






Related Photos