महत्वाच्या बातम्या

 सुलतान बिर्याणी सेंटरसह चंद्रपुरातील चार खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित : अस्वच्छतेचे गंभीर प्रकार उघड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेतील निष्काळजीपणा आणि अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील चार खाद्य आस्थापनांचे परवाने व नोंदणी प्रमाणपत्रे तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, १ एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १५ आस्थापनांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

या आठवड्यात कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये तुकूम येथील सुलतान इफहाम बिर्याणी सेंटर, आझाद गार्डनसमोरील मौचक फॅमिली रेस्टॉरंट, भद्रावती तालुक्यातील मामवेळी येथील विर्य वाईल्डलाईफ टूर्स एलएलपी (रिसॉर्ट) आणि मूल रोडवरील श्रीहरी नाश्ता सेंटर यांचा समावेश आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीदरम्यान या आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे गंभीर प्रकार समोर आले.

अन्नपदार्थ अस्वच्छ परिस्थितीत तयार केले जात होते. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी एकाच तंदूरचा वापर केला जात असल्याने अन्नाचे परस्पर दूषितीकरण होण्याचा धोका निर्माण झाला होता. स्वयंपाकघरातील रेफ्रिजरेटर गंजलेल्या अवस्थेत होते, तर चिमणी आणि गॅस बर्नरवर तेल व चिकट पदार्थांचे जाड थर साचलेले आढळले.

स्वयंपाकघरात अन्न तयार करण्याची जागा आणि भांडी धुण्याची जागा स्वतंत्र नव्हती. अन्न हाताळणारे कर्मचारी एप्रन आणि डोक्यावरील संरक्षक टोपी न वापरताच काम करत होते. भांडी अस्वच्छ असून त्यांचे योग्य निर्जंतुकीकरण केले जात नव्हते. स्वयंपाकघराच्या भिंतींवर तेलाचे डाग, तर फरशीवर कचरा आणि अन्नाचे अवशेष साचलेले होते. याशिवाय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्रे, अन्नाच्या चाचणीचे अहवाल आणि पॅकेजिंग साहित्याचे फूड ग्रेड प्रमाणपत्रही उपलब्ध नव्हते. कीटक नियंत्रणाची आवश्यक प्रक्रियाही करण्यात आली नसल्याचे तपासणीत आढळले.

या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर संबंधित चारही आस्थापनांचे परवाने व नोंदणी प्रमाणपत्रे तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्र. अ. उमप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी कुणाल मुळे, उमेश कापगते आणि प्रणय कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा भेसळीबाबत शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारीमध्ये स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि संशयित अन्नपदार्थाची माहिती देणे आवश्यक आहे.

अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच नियम व नियमन २०११ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांना निर्भेळ आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.





  Print






Related Photos