नागभीड तालुक्यात अवैध मोहफुल दारूभट्ट्यांवर पोलिसांचे छापे : १ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काम्पा गाव परिसरात सुरू असलेल्या अवैध मोहफुल दारूभट्ट्यांवर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत ८० लिटर हातभट्टीची मोहफुल दारू, २ हजार ५० किलो मोहफुल सडवा तसेच दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १ लाख ८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पहिल्या कारवाईत राजेंद्र धनराज अलोने ३९ वर्ष , रा. वार्ड क्रमांक ३, काम्पा, ता. नागभीड याला जंगलातील झाडीझुडपात मोहफुल सडवा भरताना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याठिकाणी प्रत्येकी १० लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली २० लिटर हातभट्टीची दारू, ५५० किलो मोहफुल सडवा आणि दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी ड्रम, जर्मन घमेला, टिनाचे पिंप, प्लास्टिक पाईप आदी साहित्य असा एकूण ३१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी पंचांसमक्ष हा मुद्देमाल जप्त करून नमुने तपासणीसाठी राखून ठेवले.
दुसऱ्या कारवाईत सुर्यभान महादेव मरस्कोल्हे रा. काम्पा, ता. नागभीड हा जंगल परिसरात अवैध मोहफुल दारू गाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच तो हातभट्टी सोडून पळून गेला. घटनास्थळाची पाहणी केली असता चार प्लास्टिक कॅनमध्ये ६० लिटर हातभट्टीची दारू, १ हजार ५०० किलो मोहफुल सडवा, लोखंडी ड्रम, जर्मन घमेला, प्लास्टिक पाईप, टिनाचे पिंप आणि जळाऊ लाकूड असा एकूण ७६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीचा शोध घेतला; मात्र तो मिळून आला नाही.
दोन्ही घटनांमध्ये जप्त करण्यात आलेल्या दारू व मोहफुल सडव्याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी सीलबंद करण्यात आले. उर्वरित नाशवंत साहित्य आणि मोहफुल सडवा घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई), (फ) व (क) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदर कारवाई पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदलवार, पोलीस अंमलदार जितेंद्र रामजी मारभते, विक्रम आत्राम, अश्विन भोयर, निलेश गायकवाड, किशोर देशमुख यांनी केले.




Petrol Price




