एम. जे. एफ. महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूरद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची तसेच भारतीय क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची माहिती देण्यात आली. त्यानंतर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धेत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे एकूण सात संघ सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा डॉ बालमुकुंद कायरकर, प्रा. डॉ. रोशन फुलकर, प्रा.डॉ. किशोर चौरे, प्रा.डॉ. सतीश कर्णासे, प्रा.डॉ. स्वप्नील बोबडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा.रोशन साखरकर, प्रा.कृष्णा लाभे, प्रा. ललित गेडाम, तसेच शिक्षकेतर कर्मचारी दरेकर, सागर दौरेवार आणि विद्यार्थी प्रथमेश पंजवानी, समर्थ यांच्यासह इतर खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
अटीतटीच्या सामन्यांनी रंगलेल्या या स्पर्धेत प्रा.ललित गेडाम यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. तर वाणिज्य विभाग, इयत्ता बारावी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेमुळे महाविद्यालय परिसरात दिवसभर क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतल्याने स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि खेळाडूवृत्ती विकसित होण्यास मदत झाली.




Petrol Price




