महत्वाच्या बातम्या

 सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ चोपच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


- विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा स्तुत्य सामाजिक उपक्रम; मान्यवरांकडून मंडळाच्या कार्याचे कौतुक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / वडसा : सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ, चोप यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना बुक व पेनचे वाटप करण्यात आले. मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून निलेश ठाकरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती देसाईगंज, इंजि. हेमंत कोकुलवार, इंजि. अमोल रायपुरे देसाईगंज, मेघना राऊत सचिव ग्रामपंचायत  चोप, शाळा समिती अध्यक्ष पोपटजी उईके, अरविंदजी कुथे, ठाकरे सर (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा), तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ चोप यांच्या वतीने प्रमुख पाहुणे निलेश ठाकरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती देसाईगंज यांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले आणि साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम नागपूरकर यांनी केले. यावेळी त्यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ चोप हे केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक करून मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांच्या समस्या व शाळेतील अडचणी जाणून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या भोजनाची वेळ झाल्याने मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी भोजनाची गुणवत्ता व व्यवस्थेबाबतही चौकशी करून शाळेतील परिस्थितीची माहिती घेतली. या अनोख्या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष शेखर कुथे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वा बावणे, शिवम नागपूरकर, भाऊराव पालांदुरकर, तुषार उईके, समीर दाने, गोविंद बनपूरकर, तिलक गायकवाड तसेच मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले. मंडळाच्या या उपक्रमामुळे सामाजिक कार्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठीही मंडळ कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा प्रोत्साहित झाले.





  Print






Related Photos