शहीद बाबुराव शेडमाकेंचा विद्रोह आजही जिवंत : आदिवासी स्वाभिमानाच्या लढ्याला नवी प्रेरणा!

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वातंत्र्याची मशाल पेटवणारे, गोंडवाना भूमीचा स्वाभिमान आणि अस्तित्वासाठी प्राणांची आहुती देणारे क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके यांचा संघर्ष आजही प्रत्येकाच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ निर्माण करतो. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडणाऱ्या या आदिवासी क्रांतिकारकाचे बलिदान केवळ इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित नसून, जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या आजच्या संघर्षालाही दिशा देणारे आहे. शहीद शेडमाके यांचा विद्रोही विचार आणि त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका उषाकिरण आत्राम यांनी केले.
गोंडियन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या वतीने रविवारी १ चंद्रपुरातील तुकूम येथील मातोश्री विद्यालयाच्या सभागृहात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके गोंडवाना स्वाभिमानाचा विद्रोही जागर या विषयावर विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपुरात प्रथमच आयोजित या अनोख्या व्याख्यानमालेत उषाकिरण आत्राम यांनी शहीद शेडमाके यांच्या ऐतिहासिक संघर्षाला उजाळा दिला.
शहीद बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक सत्तेविरोधात उभारलेला लढा हा स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या जिद्दीचे प्रतीक आहे. आपल्या मातृभूमीचे अस्तित्व, आदिवासी समाजाची अस्मिता आणि संस्कृती टिकवण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेत नव्या पिढीने अन्याय, शोषण आणि हक्कांच्या पायमल्लीविरोधात जागृत राहिले पाहिजे, असा संदेश आत्राम यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडी, आदिवासी कला, साहित्य व संस्कृतीचे अभ्यासक राजेश मडावी होते. त्यांनी शहीद शेडमाके यांच्या योगदानाची केवळ स्थानिक इतिहासापुरती मर्यादा न ठेवता, अखिल भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात पुनर्मांडणी करण्याची गरज व्यक्त केली. आदिवासी क्रांतिकारकांच्या संघर्षाला इतिहासात योग्य स्थान मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अभ्यासक डॉ. योगेश दुधपचारे यांनी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके -
स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व वर्तमान स्थिती या विषयावर विचार मांडले. चंद्रपूर-गडचिरोली परिसरातून ब्रिटिशांविरोधात लढा उभारून शेडमाके यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. मात्र, मुख्य प्रवाहातील इतिहासलेखनात त्यांच्या क्रांतिकार्याला अपेक्षित स्थान मिळाले नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली. आजही आदिवासी समाजाला आपल्या हक्कांसाठी आणि अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे शहीद शेडमाके यांच्या क्रांतिकार्याचा सखोल अभ्यास करून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शहीद बाबुराव शेडमाके यांचा शौर्यशाली इतिहास विस्मृतीत जाऊ नये आणि त्यांच्या बलिदानाची जाणीव प्रत्येक पिढीला व्हावी, या उद्देशाने गोंडियन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेने ही व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित करण्याचा संकल्प केला. आदिवासी समाजाचा स्वाभिमान, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्यासाठी हा उपक्रम सातत्याने पुढे नेण्याची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर कन्नाके यांनी केले. सूत्रसंचालन रमेश कुंभरे यांनी केले, तर विजय तोडासे यांनी आभार मानले. आयोजनासाठी ज्योतीराव गावडे, राजू परचाके, प्रकाश कुंभरे, मनोज आत्राम, संजय तोडासे, निलेश कुमरे, सारंग कुमरे, लता शेडमाके, अश्रका कुमरे आदींनी सहकार्य केले.




Petrol Price




