महत्वाच्या बातम्या

 लोकसहभागातून मानोऱ्यात वनराई बंधारा : २० हेक्टर धान पिकाला मिळाली संजीवनी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील मानोरा परिसरात निर्माण लोकसहभागातून मानोऱ्यात वनराई बंधारा : २० हेक्टर धान पिकाला मिळाली संजीवनीझालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाण्याअभावी संकटात सापडलेल्या धान पिकाला लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मौजा मानोरा येथे २ नोव्हेंबर रोजी शेतकरी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. या बंधाऱ्यात अडविण्यात आलेल्या पाण्यामुळे परिसरातील सुमारे १५ ते २० हेक्टर क्षेत्रावरील धान पिकाला जीवनदान मिळाले आहे.

यंदा पावसाची अनियमितता आणि पाण्याची कमतरता यामुळे परिसरातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. पिकांना आवश्यक पाणी मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शेतीसाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून वनराई बंधारा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

या उपक्रमात स्थानिक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित श्रमदान केले. बंधाऱ्यामुळे पाण्याचा साठा निर्माण झाला असून, त्याचा उपयोग १५ ते २० हेक्टर क्षेत्रावरील धान पिकाला सिंचनासाठी होत आहे. ऐन पिकांच्या गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संभाव्य पीकनुकसान टाळण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.

या वनराई बंधाऱ्याच्या उभारणीप्रसंगी सहाय्यक कृषी अधिकारी बबन हराळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनोद गवारे, दिवाकर पीपरे यांच्यासह शेतकरी नामदेव सखाराम गवारे, गोपीचंद वासुदेव गवारे, तुळशीराम कृष्णाजी गवारे, कुशब सखाराम गवारे तसेच परिसरातील अन्य शेतकरी उपस्थित होते. सर्वांनी श्रमदान करून बंधाऱ्याच्या उभारणीत योगदान दिले. शासनाच्या योजनांची वाट न पाहता ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेतल्यास पाणीटंचाईसारख्या समस्यांवर स्थानिक पातळीवर प्रभावी उपाययोजना करता येतात, हे मानोरा येथील उपक्रमातून दिसून आले आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांना आधार देणारा हा लोकसहभागाचा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.





  Print






Related Photos