पतीलाही पोटगी मागण्याचा अधिकार : उच्च न्यायालयाने वेधले हिंदू विवाह कायद्यातील तरतुदीकडे लक्ष
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : पती-पत्नीमध्ये काडीमोड झाल्यास हिंदू विवाह कायद्यानुसार पतीच्या उत्पन्नातून पत्नीला उदरनिर्वाहासाठी पोटगी (खावटी) मागण्याचा अधिकार आहे एवढेच आपल्याला माहीत आहे. पण याच कायद्यानुसार जर पती कमवत नसेल तर त्याला काडीमोड घेताना आपल्या उदरनिर्वाहासाठी कमवत्या पत्नीकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे.
त्याबाबतची तरतूद कायद्यात असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
हिंदू विवाह कायदा हा विवाहानंतरचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि दायित्वाकरिता लागू केलाला परिपूर्ण कायदा आहे. त्यानुसार कायद्यातील ज्या तरतुदीनुसार पत्नी पतीकडे पोटगी मागू शकते, त्याचा तरतुदीच्या आधारे पतीलाही तोच अधिकार आहे. हा कायदा लिंगभेद करत नाही. दोघेही पोटगीसाठी दावा दाखल करू शकतात, असे न्यायमूर्ती रोहित देव आणि ऊर्मिला जोशी यांनी म्हटले आहे. हिंदू विवाह कायद्याच्या कलम 25 मध्ये कायमस्वरूपी पोटगी, तर कलम 24 मध्ये न्यायालयात याचिका प्रलंबित असताना तात्पुरती पोटगी देण्याची तरतूद आहे याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले आहे. 22 जुलै रोजी अमरावती कुटुंब न्यायालयाने पत्नीला मासिक दहा हजार रुपये पोटगी मंजूर केल्याने पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने ते फेटाळून लावतानाच कायद्यातील इतर तरतुदींकडे लक्ष वेधले आहे.
News - Rajy