सेंद्रिय करटुले शेतीचा यशस्वी प्रयोग : केळापुर येथील शेतकऱ्याची यशोगाथा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा जिल्ह्यातील केळापूर गावचे प्रयोगशील शेतकरी अशोकसिंह धुमाळे यांनी नैसर्गिक साधनांचा योग्य वापर आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करून भाजीपाला क्षेत्रात करटूले शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांनी १० गुंठ्ठे क्षेत्रात ४० हजार रुपयाचे निव्वळ उत्पादन घेऊन उत्पन्नाचा एक नवा मार्ग शोधून काढला.
अशोकसिंह धुमाळे यांनी मे २०२५ मध्ये अवघ्या १० गुंठे क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने करटुले पिकाची लागवड केली. त्यांनी जंगलातून करटुल्याचे कंद व बियाणे जमा करून स्वतः बियाणे तयार केले. लागवड दरम्यान नर व मादी झाडांचे योग्य प्रमाण राखण्यासाठी दर १० मादी झाडांनंतर १ नर झाडाची शास्त्रीय पद्धतीने लागवड केली. पहिल्या वर्षी लागवडीनंतर अवघ्या १.५ महिन्यात फळधारणा सुरू झाली. त्यामधून आठवड्यातून २ वेळा तोडा करून प्रति तोडा ४ ते ५ किलो फळे मिळाली. बाजारात करटुल्याला २०० ते २५० रुपये प्रति किलोचा चांगला दर मिळाला व पहिल्याच वर्षी १० गुंठ्यातून त्यांनी ४० हजाराचे निव्वळ उत्पादन घेतले.
पहिल्या वर्षाच्या यशानंतर अशोकसिंह यांनी २०२६ मध्ये १ एकर क्षेत्रावर लागवड वाढवली. मागील वर्षी स्वतः तयार केलेले ३ ते ३.५ किलो बियाणे मे महिन्यात पेरले. ऑगस्ट २०२६ दरम्यान पहिला तोडा 8 किलो तर दुसरा तोडा १० किलो पर्यंत झाला असून ऑक्टोबरपर्यंत दर आठवड्याला २ तोडे निघतील असा अंदाज आहे. यामध्ये २०० ते २५० रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत असून सर्व विक्री थेट बाजारात केली जात आहे.
अशोकसिंह सेंद्रिय पीक संरक्षण पद्धतीचा अवलंब करतात. त्यांनी लागवडीपूर्वी बियाण्यांवर ट्रायकोडेर्मा (Trichoderma) ची बीज प्रक्रिया केली. कीड नियंत्रण करिता पीक लागवडीनंतर पिकाच्या लहान अवस्थेत दर १०-१० दिवसांनी निमार्कच्या २ फवारण्या घेतल्या. तसेच फळमाशी प्रादुर्भावापासून रक्षण करण्यासाठी फेरोमोन ट्रॅपचा यशस्वी वापर केला.
कृषि विज्ञान केंद्राची भेट व मार्गदर्शन -
अशोकसिंह धुमाळे यांच्या या नाविन्यपूर्ण करटुले शेती प्रयोगाला कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.जीवन कतोरे, विषयतज्ञ डॉ.भारती तिजारे, डॉ.निलेश वझीरे, डॉ.अंकिता अंगाईतकर आणि डॉ.सचिन मुळे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. भेटीदरम्यान तज्ज्ञांनी पिकाची पाहणी करून शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून अधिक उत्पन्न कसे घ्यावे, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी या शेताला भेट देऊन हा प्रयोगशील उपक्रम पहावा, असे आवाहन त्यांनी केले. अशोकसिंह धुमाळे यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने, जंगलातील नैसर्गिक वनस्पतींचे संवर्धन करून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कमी खर्चात व कमी वेळेत भरघोस उत्पन्न मिळवून इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.




Petrol Price




