बल्लारपूरमध्ये ५३ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या : मृत्यूचे कारण अस्पष्ट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : येथील पेपर मिल जुन्या कॉलनी परिसरात संजय गोविंदराव देवतळे ५३ वर्षे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय देवतळे यांच्या घरी गुरुवारी दुपारी कोणीही नव्हते. त्यांची पत्नी बाजारात गेली होती, तर १६ वर्षीय मुलगा चंद्रपूर येथे कोचिंग क्लाससाठी गेला होता. दरम्यान, दुपारी १.३० ते २.३० वाजताच्या सुमारास संजय देवतळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
दुपारी सुमारे २.३० वाजता मुलगा घरी परतला असता, घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी वडिलांनी गळफास घेतल्याचे त्याच्या लक्षात आले. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविण्यात आला. संजय देवतळे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यशवंत कुमरे करीत आहेत.




Petrol Price




