बल्लारपुरात रानभाजी महोत्सवातून आरोग्यदायी आहाराचा संदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे पोषणमूल्य व आरोग्यविषयक महत्त्व शहरी नागरिकांना अवगत व्हावे, तसेच रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश वाढावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, चंद्रपूर यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त दरवर्षी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमांतर्गत मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, बल्लारपूर परिसरात रानभाजी महोत्सव उत्साहात पार पडला.
महोत्सवाचे उद्घाटन तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष अनिल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समितीचे सदस्य, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी केली. पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्या पौष्टिक असून त्यांचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत, याबाबत टाले यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. रानभाज्यांची ओळख पटवून घेऊन त्यांचा दैनंदिन आहारातील वापर वाढविण्याचे आवाहन मृगधारा फेड फार्मर कंपनीचे संचालक अजय तोटावर यांनी केले.
बाहेरचे जंकफूड खाण्यापेक्षा स्थानिक व नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी रानभाज्यांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी केले. तसेच रानभाज्यांची ओळख नव्या पिढीला करून देणे आवश्यक असून महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध माध्यमांतून रानभाज्यांची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी सांगितले.
महोत्सवात तालुक्यातील बचत गटांच्या वतीने सुमारे ३५ विविध रानभाज्यांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलवर विविध प्रकारच्या रानभाज्या, त्यांचे पोषणमूल्य, आरोग्यविषयक फायदे व वापराची माहिती नागरिकांना देण्यात आली. रानभाज्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १०० ते १५० शहरी नागरिकांनी महोत्सवाला भेट दिल्याची माहिती आयोजकांनी दिली.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा बल्लारपूर आर. एन. कन्नाके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी उद्धव डिकळे यांनी केले. यावेळी निलेश इंगळे, बालाजी पवार, दत्तू आडे, बबन हराळ, राहुल अहिरराव, रोहित रोडगे यांच्यासह सहाय्यक कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




Petrol Price




