पुराडा-कोरची महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तडस ठार

- वनविभागाकडून घटनास्थळी पंचनामा; शवविच्छेदनानंतर मृतदेहाची नियमानुसार विल्हेवाट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : पुराडा वनपरिक्षेत्रांतर्गत पुराडा ते कोरची राष्ट्रीय महामार्गावरील नाल्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तडस ठार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. रस्त्यालगत तडस मृतावस्थेत आढळून आल्यानंतर नागरिकांनी याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एच. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक बी. यू. तागडे रामगड, एन. एल. पोले पुराडा तसेच नियतक्षेत्र वनरक्षक टी. आर. मुरकुंडे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. प्राथमिक पाहणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत तडसाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.
पंचनामा केल्यानंतर मृत तडसाचा मृतदेह पुराडा येथील वनविभागाच्या निरीक्षण कुटीत आणण्यात आला. त्यानंतर उपविभागीय वनाधिकारी जोर्जिन जॉर्ज यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तडसाचे शवविच्छेदन करण्यात आले.
शवविच्छेदनादरम्यान तडसाच्या शरीरातील सर्व अवयव सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मृत तडसाच्या मृतदेहाची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.
अज्ञात वाहनाचा शोध सुरू -
दरम्यान, तडसाला धडक देणारे वाहन कोणते, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून निघून गेल्याची शक्यता असून, वनविभागाकडून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या घटनेची नोंद वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या जंगल परिसरातून महामार्ग जात असल्याने वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करताना वेगावर नियंत्रण ठेवावे आणि वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




Petrol Price




