शासकीय शाळा, वसतिगृहांच्या सुविधांबाबत युवासेना आक्रमक


- स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, सॅनिटरी पॅडसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील शासकीय शाळा तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सॅनिटरी पॅड नॅपकीन तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करत युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे आणि युवासेना चंद्रपूर विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलनात्मक पाऊल उचलण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असल्याने अनेक शाळा व वसतिगृहांच्या परिसरात साप, विंचू तसेच अन्य वन्यजीवांचा धोका संभवतो. गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या सर्पदंशाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
त्यामुळे वसतिगृहांमध्ये सर्पदंश व वन्यजीवांच्या संभाव्य धोक्यापासून बचावासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत की नाहीत, याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा व वसतिगृहांची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करावी, तेथील गैरसोयी व त्रुटींची चौकशी करून आवश्यक त्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, तसेच संबंधित विभागांना याबाबत कडक निर्देश द्यावेत, अशी मागणी युवासेनेने केली.
विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षा आणि शैक्षणिक वातावरण याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, असा इशाराही देण्यात आला.
निवेदनानंतर प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा व वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महानगर प्रमुख सुरेश
पचारे, युवासेना शहर प्रमुख सय्यद फरदिन, तालुका प्रमुख सागर गभणे, तालुका समन्वयक पवन उडाके, आरिश शेख, अबरार शेख, सय्यद आकिब, रझा सिद्दिकी, अरशिद शेख, अहफाज शेख, फरहान खान, साहेजान शेख आणि जुनैद शेख यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




