अस्वच्छता आढळल्यास तत्काळ परवाने रद्द करा : जिल्हाधिकारी सावन कुमार

- ६० आस्थापनांना सुधारणा नोटिसा; ३७ प्रकरणांत २.४७ लाखांचा दंड, एका आस्थापनाचा परवाना निलंबित
- जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे अन्न व औषध प्रशासनाला निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, उपाहारगृहे तसेच अन्य अन्न आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची नियमित तपासणी करावी. तपासणीदरम्यान गंभीर स्वरूपाची अस्वच्छता अथवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास विलंब न करता नियमानुसार निलंबन अथवा परवाना रद्द करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभाकक्षात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश ताथोडे, अन्न सुरक्षा अधिकारी उ. मो. चरडे, पु. भी. तुरकर यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत १७७ अन्न नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी १०८ नमुने प्रमाणित, तर ४ नमुने अप्रमाणित आढळले आहेत. अन्न व्यवसायासाठी निर्धारित नियमानुसार नोंदणी व परवाना घेणे आवश्यक असून, संबंधित आस्थापनांनी अन्न सुरक्षा मानकांचे पालन करणे बंधनकारक आहे.
तपासणी करताना केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता आस्थापनातील प्रत्यक्ष स्वच्छता, अन्न साठवणुकीची पद्धत, स्वयंपाकघराची स्थिती, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि अन्न हाताळणीच्या पद्धती यांची बारकाईने तपासणी करावी. गंभीर स्वरूपाची अस्वच्छता आढळल्यास नियमानुसार तातडीने कारवाई करावी. तसेच त्रुटी आढळलेल्या आस्थापनांना नोटिसा बजावून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांना तक्रार नोंदविता यावी, यासाठी उपलब्ध तक्रार यंत्रणेची व्यापक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने सर्व तपासणी व कारवाई पारदर्शकपणे आणि नियमानुसार करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनच्या प्रतिनिधींशी संवाद साधून अन्न सुरक्षा मानके, स्वच्छता तसेच नियमांचे पालन याबाबत आवश्यक मार्गदर्शन करावे. अन्न आस्थापनांमध्ये नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळेल, यासाठी प्रशासनाने सातत्याने प्रभावी कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी स्पष्ट केले.




Petrol Price




