पुरामुळे पुल्लीगुडमची रहदारी बंद : आठ गावांचा संपर्क तुटला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा तालुका मुख्यालयापासून सुमारे ५२ किलोमीटर अंतरावर असलेल्या संवेदनशील पुल्लीगुडम गावातील नागरिकांच्या पावसाळ्यातील अडचणी यंदाही कायम आहेत. रविवारी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुल्लीगुडम गावालगतचा नाला दुथडी भरून वाहू लागला. नाल्यावरील कमी उंचीच्या रपट्यावरून पुराचे पाणी वाहत असल्याने मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी परिसरातील तब्बल आठ गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला.
रविवारी आसरअल्ली येथे आठवडी बाजार असल्याने पुल्लीगुडमसह परिसरातील अनेक नागरिक बाजारासाठी ये-जा करीत होते. मात्र, अचानक नाल्याला पूर आल्याने नागरिकांना नाल्याच्या दोन्ही बाजूंना अडकून पडावे लागले. पुराचे पाणी रपट्यावरून वाहत असल्याने वाहनांची वाहतूकही बंद करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. दरम्यान, सोमवारी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नाल्यातील पूर ओसरला आणि वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, पावसाळ्यात दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कमी उंचीच्या पुलामुळे दरवर्षी समस्या -
पुल्लीगुडम गावाजवळील नाल्यावर सध्या कमी उंचीचा पूल आहे. त्यामुळे परिसरात थोडा जरी जोरदार पाऊस झाला तरी नाल्याच्या पाण्याची पातळी वाढून रपट्यावरून पाणी वाहू लागते. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद होते आणि परिसरातील गावांचा संपर्क तुटतो. या नाल्यावर उंच पूल बांधण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, अद्याप या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी तसेच अत्यावश्यक कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही याचा मोठा फटका बसतो.
उंच पुलाचे बांधकाम तातडीने करावे -
पावसाळ्यात वारंवार उद्भवणारी वाहतुकीची समस्या लक्षात घेता पुल्लीगुडम नाल्यावर उंच व मजबूत पुलाचे बांधकाम करणे अत्यावश्यक आहे. या कामाला प्राधान्य देऊन प्रशासनाने तातडीने पाहणी करावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. उंच पूल झाल्यास पावसाळ्यातील वाहतूक सुरळीत होण्यासोबतच पुल्लीगुडमसह संपर्क तुटणाऱ्या आठ गावांतील नागरिकांचीही मोठी गैरसोय दूर होणार आहे.




Petrol Price




