महत्वाच्या बातम्या

 पळसगाव व गडचिरोली येथे एक दिवस राष्ट्रासाठी – जेन-जी उपक्रम : युवकांना व्यसनमुक्ती, संस्कार व राष्ट्रसेवेची दिशा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : अमृत संस्थेच्यावतीने एक दिवस राष्ट्रासाठी – जेन-जी या उपक्रमांतर्गत आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथील उच्च माध्यमिक सरस्वती महाविद्यालय तसेच गडचिरोली येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे युवकांसाठी विविध मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पळसगाव येथील कार्यक्रमास एकूण १३० विद्यार्थी, त्यामध्ये ७५ विद्यार्थिनी सहभागी झाल्या. यावेळी सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयचे ज्येष्ठ शिक्षक सुभाष इटनकर यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांचे जीवनचरित्र, विचार, युवकांसमोरील आवाहन, आत्मविश्वास, ध्येय निश्चिती, चारित्र्यनिर्माण आणि राष्ट्रसेवा याबाबत मार्गदर्शन केले. युवकांनी सकारात्मक विचार, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठा अंगीकारून समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, गडचिरोली येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात व्यसनमुक्त युवा या विषयावर दोन मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या सत्रात सीनियर महाविद्यालयातील ७८ विद्यार्थी, तर दुसऱ्या सत्रात ज्युनिअर महाविद्यालयातील २१० विद्यार्थी, असे एकूण २८८ विद्यार्थी सहभागी झाले.

गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना ड्रग्स व अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच युवकांची समाजातील सकारात्मक भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक, गडचिरोली विक्रम पांडे यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, योग्य नियोजन आणि उपलब्ध शासकीय योजनांची माहिती दिली.

सीनियर सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उईके, तर ज्युनिअर सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कुत्तरमारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गडचिरोलीच्या DEO माधुरी रोटकर यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वेदांत मेहता यांनी नियोजन व अंमलबजावणीत सक्रिय सहभाग घेतला.

युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे, त्यांच्यात सकारात्मक विचार व संस्कार रुजविणे, करिअरच्या योग्य दिशा उपलब्ध करून देणे आणि युवकांना राष्ट्रनिर्माणाच्या कार्याशी जोडणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. जिल्हा व्यवस्थापक, अमृत गडचिरोली, विक्रम मोहन पांडे यांनी कळविले आहे.





  Print






Related Photos