महत्वाच्या बातम्या

 कुलूपबंद घर फोडून ३.४७ लाखांचा ऐवज लंपास


- कामठीत मध्यरात्री घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३० हजारांची रोकड चोरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : कुटुंबीय नातेवाईकांकडील कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने कुलूपबंद घराचे दार फोडून तब्बल ३ लाख ४७ हजार ६५५ रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. चोरीच्या ऐवजात ३ लाख १७ हजार ६५५ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ३० हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. कामठी शहरातील कुंभारे कॉलनी, छत्रपती नगर परिसरात मंगळवारी १८ आगस्ट मध्यरात्री ही घरफोडी झाली असून, बुधवारी १९ आगस्ट सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश अशोक जगनीत ३५ वर्षे रा. कुंभारे कॉलनी, छत्रपती नगर, कामठी हे कुशन व फर्निचरचे व्यापारी आहेत. कामठी शहरात त्यांचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी ते कुटुंबीयांसह गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याने त्यांनी घराचे सर्व दरवाजे व्यवस्थित कुलूपबंद केले होते.

हीच संधी साधत अज्ञात चोरट्याने मंगळवारी मध्यरात्री घराच्या परिसरात कोणीही नसल्याची खात्री करून घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटाची झडती घेतली. कपाटातील दागिने आणि रोख रक्कम चोरून चोरटा पसार झाला.

दरम्यान, आकाश जगनीत यांची थोरली बहीण शेजारीच राहते. बुधवारी सकाळी तिच्या लक्षात घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे आले. घरफोडी झाल्याचा संशय आल्याने तिने तातडीने आकाश यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळाल्यानंतर आकाश जगनीत यांनी सायंकाळी कामठी गाठून घराची पाहणी केली. घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. तपासणी केली असता ३ लाख १७ हजार ६५५ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ३० हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ४७ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यानंतर त्यांनी कामठी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आणि पंचनामा केला. चोरीच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) कलम ३०५ (३), ३३१ (३) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास करण्यात येत आहे.





  Print






Related Photos