गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- जलसंधारणाच्या विविध योजनांचा आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्यावतीने जलसंधारणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येते. त्यात जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, जलजशक्ती अभियान, अमृत सरोवर अभियानाचा समावेश आहे. या सर्व योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात याव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
या चारही योजनांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी अजय लाडसे, सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार, सहाय्यक भूवैज्ञानिक पी.पी. सयाम, जलतज्ञ माधव कोटस्थाने, उपविभागीय जलसंधारण अधिकारी अक्षय बेंद्रे, बी.जी. खैरे, आर.के. शाम, उपविभागीय अभियंता प.व. पांढरे, संजय मिसाळ यांच्यासह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी महेंद्र फाटे, राजु पवार, सुचित शेंद्रे, राजेंद्र खर्चे आदी उपस्थित होते.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेमुळे प्रकल्पातील गाळ कमी होऊन पाणीधारण क्षमता वाढेल, शिवाय शेतकऱ्यांना शेतीसाठी सुपीक गाळ उपलब्ध होईल. त्यामुळे या योजनेत घेण्यात आलेल्या प्रकल्पातील अधिकाधिक गाळ काढल्या जावा. गाळ काढण्यासाठी संस्थेला व वाहून नेण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना गाळ नेण्यासाठी प्रोत्साहित करा, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जलयुक्त शिवार ही योजना अतिशय महत्वाची आहे. योजनेंतर्गत कमी कालावधीत जिल्ह्यात जास्त काम होणे अपेक्षित आहे. त्यामुळे तातडीने कामे प्रस्तावित करा, आराखडे करा व निधी मागणी प्रस्ताव सादर करा. जलयुक्तची कामे करण्यासाठी फार कमी कालावधी असल्याने कामांना तातडीने सुरुवात करण्यात यावी. जिल्ह्यात या योजनेच्या टप्पा दोनसाठी १५० गावे मंजूर करण्यात आली आहे. गावकऱ्यांना या योजनेचे महत्व समजून सांगा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जलशक्ती अभियान व अमृत सरोवर अभियानाचा देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
News - Wardha | Posted : 2023-05-11