आ. किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन : ९६ वर्षांची परंपरा अखंड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी यंदाही पारंपरिक उत्साह आणि भक्तिभावाने गणरायाचे आगमन झाले. जोरगेवार कुटुंबीयांकडून गेल्या ९६ वर्षांपासून अखंडपणे गणेशोत्सवाची परंपरा जपली जात आहे. त्यांच्या आजोबांनी १९३१ मध्ये सुरू केलेल्या या गणेशोत्सवाचा वारसा आता तिसरी पिढी पुढे नेत आहे. भक्ती, श्रद्धा आणि कुटुंबातील एकोप्याच्या भावनेतून सुरू झालेली ही परंपरा काळाच्या ओघात अधिक समृद्ध होत गेली. पुढील पिढ्यांनीही ती तितक्याच श्रद्धेने जपली असून, आ. किशोर जोरगेवार यांच्या कुटुंबीयांकडून हा वारसा पुढे नेला जात आहे.
गणरायाच्या आगमनानिमित्त राजमाता निवासस्थानी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून कुटुंबीयांनी बाप्पाचे स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक आणि आप्तेष्टांनी भक्तिभावाने गणरायाचे दर्शन घेतले. ९६ वर्षांच्या या गणेशोत्सवाशी जोरगेवार कुटुंबातील अनेक पिढ्यांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. काळ बदलला, परिस्थिती बदलली; मात्र गणरायावरील श्रद्धा आणि कुटुंबीयांनी जपलेली परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे हा गणेशोत्सव धार्मिक उत्सवासोबतच कौटुंबिक भावबंध, संस्कार आणि परंपरेचा वारसा जपणारा ठरला आहे.
यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी गणरायाच्या चरणी मंगलमय प्रार्थना केली. समाजातील दुर्जन शक्तींचा नाश व्हावा, जनतेच्या जीवनातील सर्व विघ्ने दूर व्हावीत, प्रत्येक कुटुंबात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदावी, अशी त्यांनी कामना केली. समाजातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तिचे सकारात्मक ऊर्जेत रूपांतर व्हावे आणि प्रत्येक व्यक्तीला नव्या आशेने व सकारात्मक विचारांनी पुढे जाण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.




Petrol Price




