महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्याचा दुहेरी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाने गौरव


- राष्ट्रीय पोषण माह आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील; उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / वर्धा : महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याचा राज्यस्तरावर दुहेरी प्रथम क्रमांकाने गौरव करण्यात आला. आठव्या राष्ट्रीय पोषण माहमध्ये उत्कृष्ट कामगिरी तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत निर्धारित उद्दिष्टाच्या १४२ टक्के नोंदणी पूर्ण करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल जिल्ह्याला गौरविण्यात आले.

मुंबई येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्ह्याच्या वतीने जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी पुरस्कार स्वीकारले.

सुपोषित नारी, सशक्त परिवार अभियान ठरले यशाचे माध्यम -
१७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या आठव्या राष्ट्रीय पोषण माहची संकल्पना सुपोषित नारी, सशक्त परिवार अभियान ही होती. या अभियानांतर्गत जिल्ह्यात महिला, बालके, किशोरवयीन मुली आणि कुटुंबांच्या पोषण व आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.

अभियानात लठ्ठपणा कमी करणे, बालपणीची काळजी व शिक्षण, पोषणही शिक्षणही, अर्भक व बालक आहार पद्धती, पुरुष सहभाग, स्थानिक सक्षमीकरण व स्वावलंबन, एकत्रित कृती आणि डिजिटायझेशन यांसारख्या विषयांवर विविध उपक्रम राबविण्यात आले. पोषण अभियानाचा मुख्य उद्देश समुदायाचा सहभाग वाढवून पोषणाला जनआंदोलनाचे स्वरूप देणे हा आहे.

प्रधानमंत्री मातृवंदनाची १४२ टक्के उद्दिष्टपूर्ती -
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत जिल्ह्याने निर्धारित उद्दिष्टाच्या तब्बल १४२ टक्के नोंदणी पूर्ण करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला. पात्र लाभार्थी महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी अंगणवाडी केंद्रस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात आले. लाभार्थी महिलांची नोंदणी, जनजागृती, कागदपत्रांची पूर्तता आणि ऑनलाइन प्रक्रियेला गती देण्यात आली.

अंगणवाडी यंत्रणेच्या अथक परिश्रमाचे फलित -
जिल्ह्याला मिळालेला हा दुहेरी प्रथम क्रमांक म्हणजे जिल्हा कार्यक्रमाधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.





  Print






Related Photos