सांस्कृतिक कार्यक्रमातून महिलांचा कलात्मक विकास : माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे
- अमर गीता फाउंडेशनच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महिलांना कौटुंबिक जबाबदारी, घरातील कामे, मुलांचे शिक्षण, संगोपन करीत असतांना त्या आपल्या कलागुणांना वाव देवु शकत नाही. अनेक महिलांमध्ये आधीपासूनच कला-कौशल्य असूनही कामाच्या व्यापामुळे तसेच संधी व व्यासपीठ उपलब्ध होत नसल्याने त्या आपल्यातील कलागुण दाखवू शकत नाही. अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला पुढे येऊन आपल्या कलांना विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे खरोखरच अभिनंदनिय आहे. महिलांनी आपल्या नियमित, दैनंदिन कामातून वेळ काढून आपल्या मधील सुप्त गुण बाहेर काढून विविध कला व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा व आपल्यातील कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न करावा व अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून आपला कलात्मक विकास करावा, असे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी केले. अमर- गीता फाउंडेशनचे संचालक विवेक बैस व त्यांच्या पत्नी निता बैस, यांच्या वतीने व लोकमत सखी मंच गडचिरोलीच्या सहकार्याने आयोजित महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व होम मिनिस्टर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
अमर गीता फाउंडेशन गडचिरोलीच्या वतीने व लोकमत सखी मंचच्या सहकार्याने महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व होम मिनिस्टर कार्यक्रम विसापूर कॉम्प्लेक्स येथील जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूलच्या मैदानावर पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, भाजपचे जनार्धन साखरे, अमर गीता फाउंडेशन चे विवेक बैस, रोहनकर, विलासजी नैताम, भाजप महिला आघाडीच्या शहर सचिव नीता बैस, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, भाजप महिला आघाडी ओबीसी मोर्चाच्या शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, भाजप महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, लोकमत सखी मंचच्या संयोजिका रश्मी आखाडे, सहसंयोजिका भाग्यश्री गड्डमवार , मृणाल मुरकुटे, रोहिणी मेश्राम, आरती भांडेकर उपस्थित होत्या.
यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देणारे सांस्कृतिक कार्यक्रम आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच या सर्व स्पर्धामध्ये उत्कृष्ट कला सादर करून फायनल राउंड मध्ये यशस्वी झालेल्या सोनाली बोंदरे यांची होम मिनिस्टर म्हणून निवड करण्यात आली व त्यांचा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, सखी मंचच्या सहसंयोजिका भाग्यश्री गड्डमवार, भाजपचे शहर उपाध्यक्ष विवेक बैस यांच्या हस्ते भेटवस्तू, आकर्षक पैठणी साडी व उत्कृष्ट मुकुट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या होम मिनिस्टर कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांमध्ये जिल्हा गेम मध्ये वर्षा धकाते तर तळ्यात मळ्यात स्पर्धेत कल्याणी वाघमारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच बलून गेम स्पर्धेत सोनाली बोन्द्रे तर उखाणे स्पर्धेत सर्वात जास्त २ मिनिटात १९ उखाणे घेऊन रजनी गहाणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर टायर गेम स्पर्धेत निकिता टिचकुले यांनी प्रथम येण्याचा मान मिळविला. सर्व विजयी महिलांना माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, सहसंयोजिका भाग्यश्री गड्डमवार, स्पर्धेचे आयोजक विवेक बैस, रोहनकर, जनार्धन साखरे, यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला .
यावेळी प्रियंका मेडिया व कुमेश्वरी पवार यांनी उत्कृष्ट गोंडी नृत्य सादर केले. कार्यक्रमामध्ये लोकमत सखी मंच सदस्य व विसापूर कॉम्प्लेक्स येथील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
News - Gadchiroli