महत्वाच्या बातम्या

 वडिलांच्या रक्ताचे नातेही दारूसमोर हरले : पैशांसाठी मुलाने काठीने केली बेदम मारहाण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : दारूच्या नशेत मुलाने वडिलांकडे वगार विक्रीचे पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या मुलाने वडिलांच्या हातातील काठी हिसकावून त्यांच्या हातावर आणि पायाच्या मांडीवर मारहाण केली. या मारहाणीत वडिलांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून, मुलाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिल्याची गंभीर घटना सिंदेवाही तालुक्यातील चेक बामणी येथे घडली.

विनायक केशव शेडमाके (७५), रा. चेक बामणी, ता. सिंदेवाही, असे जखमी वडिलांचे नाव आहे. तर संजय विनायक शेडमाके असे आरोपी मुलाचे नाव आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, विनायक शेडमाके हे पत्नीसमवेत राहून शेती करतात. त्यांना दोन मुले असून दोघांचेही विवाह झाले आहेत. लहान मुलगा संजय याला दारूचे व्यसन असून तो दारूच्या नशेत आई-वडिलांशी वारंवार वाद घालून मारहाण तसेच शिवीगाळ करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विनायक शेडमाके शेतातून घरी जात असताना गावातील चौकात देवराव गुरनुले यांच्या पानठेल्याजवळ संजय त्यांना भेटला. त्याने दारूच्या नशेत वडिलांकडे वगार विक्रीचे पैसे मागितले. मात्र, ते पैसे शेतीच्या कामासाठी लागणार असल्याचे वडिलांनी सांगताच संजयने संतापून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वडिलांच्या हातातील काठी घेऊन त्यांच्या उजव्या हातावर तसेच डाव्या पायाच्या मांडीवर मारहाण केली.

मारहाणीनंतर विनायक शेडमाके घरी गेले. उजव्या हाताला सूज आल्याने त्यांनी सिंदेवाही येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. वैद्यकीय तपासणीत हाताला फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेप्रकरणी त्यांनी सिंदेवाही पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध तक्रार दाखल दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.





  Print






Related Photos