गोंडवाना विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण


- राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने मंगळवारी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणाचे संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यापीठ परिसरात विविध वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि बदलते हवामान लक्षात घेता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याबरोबरच लागवड केलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करणेही आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थितांनी अधोरेखित केले.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला विद्यापीठाचे सिनेट सदस्य सतीश पडोळे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. विवेक जोशी, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा भाके, वाणिज्य विभागप्रमुख तथा सिनेट सदस्य डॉ. उत्तम कांबळे, डॉ. प्रीती पाटील, डॉ. प्रमोद जावरे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीसोबतच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. वृक्षारोपण हा त्याच उपक्रमांचा एक भाग असून, विद्यापीठ परिसर अधिक हिरवागार आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
वृक्षलागवड केवळ औपचारिक उपक्रम न राहता लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन आणि संवर्धन करण्यावर भर दिल्यास त्याचा पर्यावरणाला दीर्घकालीन लाभ होईल. विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.




Petrol Price




