बल्लारपूरचे काशीनाथ सिंह यांना महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार


- कोरोना काळातील उल्लेखनीय समाजसेवेची दखल; सन्मानामुळे बल्लारपूरचा गौरव
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने धावून जाणारे बल्लारपूर येथील काशीनाथ स्वामीनाथ सिंह यांना कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथील वी द चेंज फाउंडेशन च्या वतीने आयोजित महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे बल्लारपूर शहरासह चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
कोरोना महामारीच्या काळात काशीनाथ सिंह हे स्वतः दोन वेळा कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. मात्र, त्यानंतरही त्यांनी नागरिकांची सेवा थांबवली नाही. २४ तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे, मोठ्या संख्येने नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करून घेण्यासाठी सहकार्य करणे तसेच कोरोना रुग्णांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या निस्वार्थ समाजसेवेची दखल घेत त्यांना महाराष्ट्र गुण गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी काशीनाथ सिंह यांच्या कार्याची विशेष दखल घेत फाउंडेशनच्या अध्यक्षांनी त्यांचा विशेष सन्मान करत त्यांच्या समाजसेवेचे कौतुक केले. या अगोदर त्यांना हैदराबाद येथे सन्मानित केले होते. आता शिर्डी, अहिल्यानगर येथे मिळालेल्या महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कारामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला पुन्हा एकदा राज्यस्तरीय मान्यता मिळाली आहे.
पुरस्कार स्वीकारताना काशीनाथ सिंह यांनी आपल्या मनोगतात या यशाचे श्रेय सर्वप्रथम आपल्या आई-वडिलांना दिले. समाजसेवेची प्रेरणा देणाऱ्या आपल्या कुटुंबीयांसोबतच कोरोना काळात वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य आणि आशीर्वाद देणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे त्यांनी विशेष आभार मानले. तसेच कठीण परिस्थितीत खंबीरपणे साथ देणाऱ्या आपल्या पत्नीचेही त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.
आपला हा सन्मान त्यांनी आपल्या आई-वडिलांना आणि आ. सुधीर मुनगंटीवार यांना समर्पित केला. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वेळ मिळेल तेव्हा समाजासाठी काहीतरी योगदान द्यावे. माणसाचा जन्म मोठ्या भाग्याने मिळतो आणि चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींची समाज सदैव आठवण ठेवतो, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या उल्लेखनीय सन्मानाबद्दल काशीनाथ सिंह यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, हितचिंतक तसेच बल्लारपूर शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




Petrol Price




