महत्वाच्या बातम्या

 विश्वासार्हतेचे संकट ही मीडिया क्षेत्रातील सर्वात मोठी समस्या : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


- IIM नागपूर येथे मीडिया कॉन्क्लेव्ह संपन्न
-  पत्रकारितेची मूलभूत मूल्ये जपण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : लोकशाहीच्या प्रगतीसाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि स्वतंत्र तसेच विश्वासार्ह माध्यमे अत्यंत महत्त्वाची आहेत. मात्र, आज मीडिया क्षेत्रासमोर विश्वासार्हतेचे संकट ही सर्वात मोठी समस्या आणि आव्हान बनले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केले. भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM Nagpur) येथे Media, Leadership and the New World Order या विषयावर आयोजित IIM Nagpur Media Conclave 2026 मध्ये ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

गडकरी म्हणाले की, ज्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या कार्याची दखल घेतली जाते, त्याचप्रमाणे चांगल्या पत्रकारितेलाही समाजात नेहमीच मान्यता मिळते. आगामी काळात जे लोक आपल्या विश्वासार्हतेसोबतच पत्रकारितेच्या व्यवसायाच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण करतील, तेच या क्षेत्रात टिकून राहतील. लोकशाही मजबूत करण्यासाठी, सामाजिक व राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आणि ज्ञानाचे रूपांतर व प्रसार करण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. या गोष्टी भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी उपयुक्त ठरतील, असेही गडकरी यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला Lloyds Metals and Energy Ltd चे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रभाकरन यांनी केवळ नोकरीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता उद्योजकतेकडे करिअरचा पर्याय म्हणून पाहण्याचे आवाहन केले. संधींच्या शोधात परदेशात जाण्याऐवजी देशातीलच विपुल संधींचा उपयोग करावा, असा सल्ला त्यांनी दिला. आपल्या प्रवासाची आठवण सांगताना प्रभाकरन म्हणाले की, मला एकेकाळी नक्षलवाद आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरलेल्या गडचिरोलीच्या मातीत संधी दिसली.

टाटा समूहाने लॉजिस्टिकच्या अडचणींमुळे जे काम पुढे नेले नव्हते, ते मी आत्मविश्वासाने सुरू केले आणि आज स्टीलनिर्मितीच्या क्षेत्रात गडचिरोली नवीन कथा लिहित आहे. तसेच आंध्र प्रदेशातील जोंनागिरी येथे भारतातील पहिली खासगी सोन्याची खाण सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. गडचिरोलीतील तरुणांना ऑस्ट्रेलियात पाठवून खाणकामाचे उच्च शिक्षण व कौशल्य विकास पुरविण्यावर भर देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात IIM नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेट्री यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीवर प्रकाश टाकत देश जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले. या परिषदेला Press Trust of India (PTI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय जोशी, Business Standard चे संपादकीय संचालक ए. के. भट्टाचार्य, Blitz India Media Group चे अध्यक्ष दीपक द्विवेदी यांच्यासह अनेक मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos