महत्वाच्या बातम्या

 कोठारी ग्रामपंचायतीसमोर तरुणांचा एल्गार


- हिशेब द्या, प्रश्न सोडवाचा सूर : विशेष ग्रामसभेसाठी जेन-झीचा ठिय्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गावाच्या विकासाचा गाडा नेमका कुठे अडला आहे, ग्रामस्थांकडून वसूल होणाऱ्या करांचा विनियोग कसा होतो आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष का केले जाते, या प्रश्नांनी बल्लारपूर तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायतीसमोर आता वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत विविध प्रश्न उपस्थित करीत गावातील जेन-झी तरुणांनी ५ सप्टेंबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.


गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांची यादीच तरुणांनी प्रशासनासमोर ठेवली आहे. पाणीपुरवठ्याची समस्या, नळ जोडणी नसतानाही आकारली जाणारी पाणीपट्टी, भरलेली घरपट्टी पुन्हा आकारली जात असल्याचा आरोप, गावातील तसेच महामार्गावरील आठ पथदिवे अद्याप प्रलंबित असणे, यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. वीज मीटर बदलण्याच्या निर्णयात ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. केवळ निर्णय घेण्यापेक्षा त्या निर्णयामागील कारणे ग्रामस्थांसमोर स्पष्ट करावीत, अशी मागणी तरुणांनी केली आहे.

गावातील विकासकामांसाठी प्राप्त निधी आणि त्याच्या खर्चाचा तपशीलही आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला आहे. स्मशानभूमी व तलाव सौंदर्यीकरणासाठी प्रत्यक्षात कोणती कामे झाली, नाली व पाणीपुरवठ्यासाठी किती निधी प्राप्त झाला आणि त्यापैकी किती रक्कम खर्च करण्यात आली, याची सविस्तर माहिती ग्रामस्थांसमोर ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक निधी हा ग्रामस्थांचा असल्याने त्याच्या वापराबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रे व खर्चाचा तपशील ग्रामसभेत मांडावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तातडीने विशेष ग्रामसभा आयोजित करावी, अशी प्रमुख मागणी तरुणांनी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्येक प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली आहे. या आंदोलनात आशिष बोडे, शुभम खोब्रागडे, गणेश इजगिरवार, आशिष खोब्रागडे, सौरव ढवस, शुभम बुरेवार, विनोद देवळकर, यश लोहे, पवन बामणे, नितीन खाडीलकर, रणजित बांबोळे, संदीप पुणेकर, तन्मय चौधरी, संघर्ष जुनघरे आणि अमोल वडघणे यांच्यासह अनेक तरुण सहभागी झाले आहेत.

ग्रामपंचायत प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन विशेष ग्रामसभा बोलावते का, उपस्थित केलेल्या प्रश्नांवर कोणते स्पष्टीकरण देते आणि प्रलंबित नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी कोणती पावले उचलते, याकडे आता कोठारी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos