विद्यार्थ्यांनी स्वीकारली शिक्षकांची भूमिका : वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विद्याप्रगती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक, लिपिक व शिपाई यांच्या भूमिका साकारत एक दिवसासाठी शाळेची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाला बल्लारपूरच्या तहसीलदार रेणुका कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेचे संस्थापक हेमंत मानकर, संस्थापिका रझिया खान, मुख्याध्यापक विजय शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या फरजाना शेख यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी भाषणे, नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शिक्षकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध शिक्षकांच्या भूमिका स्वीकारत वर्गातील अध्यापनासह शाळेतील दैनंदिन कामकाजाचा अनुभव घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व जबाबदारीची भावना विकसित होण्यास मदत झाली.
वर्गात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे सांगितले. त्यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक विजय शिंदे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त, कठोर परिश्रम, मूल्ये आणि शिक्षकांचे मार्गदर्शन अंगीकारावे, असे आवाहन केले. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सादरीकरण विद्यार्थ्यांनीच केले. कार्यक्रमाचे संचालन अर्श शेख व प्रणवी तांद्रा यांनी केले, तर आलम सिद्दीकी यांनी आभार मानले.




Petrol Price




