महत्वाच्या बातम्या

 ओबीसी हक्कांसाठी बल्लारपुरात मंडल यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत


- जातनिहाय जनगणना, सामाजिक न्याय व विविध मागण्यांसाठी दुचाकी रॅली; संत तुकाराम सभागृहात जाहीर सभा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : ओबीसी समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आयोजित सकल ओबीसी महामोर्चाच्या मंडल यात्रेचे शनिवारी, ८ ऑगस्ट रोजी बल्लारपूर शहरात आगमन झाले. नगर परिषद चौक येथे या यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्षा डॉ. अल्का अनिल वाढई, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अनिल सदाशिव वाढई, शहराध्यक्ष तथा नगर परिषद गटनेते अब्दुल करीम शेख, ओबीसी समन्वय समितीचे माजी अध्यक्ष विवेक खुटेमाटे, काँग्रेस ओबीसी बल्लारपूरचे शहराध्यक्ष गणपत इटणकर, स्वीकृत नगरसेवक घनश्याम मूलचंदानी, स्वीकृत नगरसेवक भास्कर माकोडे, श्रीधर फटाले आणि अशोक चितले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सकल ओबीसी महामोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोराम यांच्या नेतृत्वाखाली मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना, सामाजिक न्याय, घटनात्मक हक्क तसेच विविध प्रलंबित मागण्यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही यात्रा काढण्यात आली.

यात्रेच्या निमित्ताने बल्लारपूर शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकजूट दाखवत सहभागी नागरिकांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.

यानंतर संत तुकाराम सभागृह येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत नगराध्यक्षा डॉ. अल्का अनिल वाढई यांनी मनोगत व्यक्त करत ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी एकजूट, सामाजिक न्याय आणि जातनिहाय जनगणनेचे महत्त्व अधोरेखित केले. ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला आपला ठाम पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जाहीर सभेत उपस्थित अन्य मान्यवरांनीही ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. या कार्यक्रमाला ओबीसी समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन नीतीन वराकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विवेक खुटेमाटे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos