महत्वाच्या बातम्या

 रामटेकमध्ये टी-९८ वाघाचा मृत्यू : अशक्तपणामुळे वन विभागाचे होते सतत लक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत मनसर उपवनक्षेत्रातील खुमारी शिवारात पेंच व्याघ्र प्रकल्पातील टी-९८ या वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा वाघ अत्यंत अशक्त अवस्थेत असल्याने वन विभागाचे संयुक्त पथक त्याच्यावर सतत लक्ष ठेवून होते.

मात्र, अखेर १४ जुलै रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

वन विभागाच्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास खुमारी येथील एका खासगी शेतात टी-९८ हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. हा वाघ पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चोरबाहुली वनपरिक्षेत्रात नियमित वावरत असल्याने तेथील वन कर्मचाऱ्यांना परिचित होता.

यापूर्वी १३ जुलै रोजी चोरबाहुली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना टी-९८ हा वाघ अत्यंत अशक्त अवस्थेत फिरताना दिसून आला होता. त्यानंतर चोरबाहुली आणि रामटेक वनपरिक्षेत्राच्या संयुक्त पथकाने त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले होते. मंगळवारी दुपारपर्यंत वाघाच्या हालचाली सुरू होत्या. 

मात्र, दुपारच्या सुमारास त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसून न आल्याने पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी वाघाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे सहायक वनसंरक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच रामटेक वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर वाघाचा मृतदेह पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी नागपूर येथील टीटीसी केंद्रात हलविण्यात आला.

उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

प्राथमिक स्तरावर वाघाचा मृत्यू अशक्तपणामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होईल, असे वन विभागाने सांगितले आहे.

दरम्यान, पेंच व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध टी-९८ वाघाच्या मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, वन विभागाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos