सुसाट दुचाकी संरक्षक कठड्याला धडकली : दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यालगतच्या लोखंडी संरक्षक कठड्याला धडकल्याची भीषण घटना मांडगाव ते आष्टा मार्गावर घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विलास भाऊराव उगे ५२ वर्षे रा. शहालंगडी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास उगे हे त्यांच्या एमएच-३२-टी-७३८४ क्रमांकाच्या दुचाकीने मांडवगडच्या दिशेने प्रवास करीत होते. मांडगाव ते आष्टा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आल्यानंतर अचानक दुचाकीवरील त्यांचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी संरक्षक कठड्याला जोरात धडकली.
धडक इतकी भीषण होती की, विलास उगे यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
या अपघातामुळे शहालंगडी गावात शोककळा पसरली असून, विलास उगे यांच्या अकस्मात निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
News - Wardha




Petrol Price




