महत्वाच्या बातम्या

 सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात


- चामोर्शीत कारवाई, तंबाखूसह ९ लाख ७२ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची चारचाकी वाहनातून वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत प्रतिबंधित तंबाखूसह चारचाकी वाहन असा एकूण ९ लाख ७२ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सीवरील कुरुड गाव परिसरात पोहार नदीच्या पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली.

पोलिस सहायक अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या पथकाला प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पोहार नदीच्या पुलाजवळ सापळा रचून वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी संशयित जीप (एमएच ३३ टी-५८९२) अडवून तिची झडती घेण्यात आली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला.

या प्रकरणी पोलिसांनी नंदकिशोर दिवरुजी शेट्टे २१ वर्ष रा. चामोर्शी आणि राजेंद्र ईश्वर नैताम २१ वर्ष रा. मार्कड मोहल्ला, चामोर्शी यांना ताब्यात घेऊन अटक केली. प्राथमिक चौकशीत सदर तंबाखू चंद्रकांत शत्रुघ्न पिपरे याच्या सांगण्यावरून आणल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोर्रेम यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जप्त केलेल्या तंबाखूचा साठा, त्याची वाहतूक तसेच या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे तंबाखू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. शहरासह ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर सातत्याने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos