महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरात सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या युवकावर गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिध / बल्लारपूर : शहरातील सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या एका युवकाविरुद्ध बल्लारपूर पोलिसांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा एनडीपीएस अंतर्गत कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवार, १९ जुलै रोजी शिवाजी वॉर्ड परिसरातील खांडक्या बल्लारशाह समाधीस्थळाजवळ करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड हे आपल्या पथकासह अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध विशेष गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, शिवाजी वॉर्डातील खांडक्या बल्लारशाह समाधीस्थळाजवळ एक युवक गांजाचे सेवन करत आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली.

यावेळी प्रथम सिद्धार्थ टिपले २२ वर्षे रा. वॉर्ड क्र. ४, बामणी, बल्लारपूर हा गांजाने भरलेल्या सिगारेटद्वारे अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आला. पोलिसांना पाहताच त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ घेराव घालून त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपीचे झडती घेतली असता त्याच्याकडून गांजाने भरलेली सिगारेट व आगपेटी जप्त करण्यात आली. सेवनासाठी वापरण्यात आलेले साहित्य जागीच नष्ट करण्यात आले.

आरोपी अंमली पदार्थाच्या नशेत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचे रक्त व लघवीचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी घेऊन सीलबंद करण्यात आले आहेत.

या प्रकरणी प्रथम सिद्धार्थ टिपले याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा एनडीपीएस कलम २७ अन्वये बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos